अजी म्या देव पाहिला

 

अजी म्या देव पाहीला

एका लुळ्यापांगळ्यात, भर उन्हात लाकडी फळ्याच्या चारचाकी गाडीवर

एका हातात चप्पल घालून आपले ओझे वाहत गाडी हाकतांना

कोणी भीक देताच तुझ भल होवोम्हणून आशीर्वाद देतांना,

कुणा म्हातारीत, ती जाता भीक मागण्या कुणाच्या दारी

मिळताच भीक घरात पोरबाळ नांदो, पोरी तुझ कुंकू लांब टिको

घरच्या लक्ष्मी विषयी तिच्या हृदयातून खरी दुवा निघतांना

 

अजी म्या देव पाहीला

अनाथालयातील बालकांत, जेव्हा कुणी वह्या पुस्तकांची,

शालेय कपड्यांची मदत करताच, ज्याने त्यांना पुढे जाण्याचे बळ दिले,

त्याविषयी त्यांच्या हृदयात निर्माण झालेल्या कृतज्ञतेत,

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या निराश्रित, अन्नदान करून,

दोन वेळ खावू घालून त्यांच्या मुखावर हास्य आणणाऱ्या व्यक्तीत

अन उदरशांती होताच निघणाऱ्या त्यांच्या तृप्ततेच्या ढेकरेत

 

अजी म्या देव पाहिला

वृद्धाश्रमातील जेष्ठ नागरिकांत, सेवाभाव समजून वैद्यकीय मदत करणाऱ्या

डॉक्टरांविषयी आपुलकीने अशृ गाळून, आपल्या मुलांनी दिलेल्या वेदना

विसरणाऱ्या त्या असहाय, अगतिक माणसांत,

कोणा संकटमोचकात, असता कोणी संकटात वा निर्धन अबलेस मदत करून

तिला घरी सोडून संकटातून वाचविणाऱ्या मानवरूपी भगवंतात,

आपल्या मुलीला सुखरूप पाहून तिच्या मायबापाच्या हृदयातून निघणाऱ्या आशिर्वादात

 

अजी म्या देव पाहिला

तो होता मंदिरमस्जिदी बाहेर बसून, कुष्ठरोगी होऊन,

आपल्या वाहणाऱ्या जखमांवर माशा भिनभिनून

तो होता हातपाय गळून तडफडत केवळ जमिनीवर धड पडून

जात नव्हते त्याच्या जवळ कोणी, पाहताच कोणाला ही येई मळमळून

खरा देव अन खुदा तर तोच होता, त्यांच्यातच होता,

तोच तर बसला होता त्यांच रूप घेऊन

 

आपल्याला खऱ्या भगवंताची ओळखच नव्हती

तो जाणीवपूर्वक तेथे बसला होता लपून

पाहत होता रंजल्यागांजल्यांविषयी कुणाचे हृदय येते द्रवून

मंदिरमस्जिदीत बसलेला देव, विधाता घेत असलेली भक्तांची परीक्षा

आरामात पाहत होता हसून, दुरून आपल्या आलिशान धर्मस्थळी बसून