आई

 

माझ्या माऊलीची काय गाऊ थोरवी

ती तर कल्पतरू वृक्षाची पालवी

जरी असता घरात अठराविश्व दारिद्र्य

मोठ्या आनंदाने, न होऊ देता जाणीव

कोडकौतूक पुरवी, लाडीगोडीने बोलून

उदया तुला नक्कीच देईलअसे सांगून

 

काय सांगू माझ्या माऊलीच्या हाताची गोडी

तुराट्यापराट्या वेचावयास जाये

घालून पायात टायरच्या चपलांची जोडी

चुलीसाठी इंधन वेचतांना

हातापायांवर काटेरी झुडुपांचे ओरखडे येऊन

रक्त निघे बाभळीचे काटे हातात बोचून

मोठ्या दिमाखात डोक्यावर भलीमोठी मोळी घेऊन

ताठ मानेन तर्रा तर्रा येई घरा पदर कंबरेस खोचून

माय माउली आनंदाने चुलीत निखारा ठासून

परातीत भाकऱ्या थापे सार सोसून

मळकट हातान त्यावर पाणी लेपून

राखेत भिजलेली गरम गरम भाकर

जेव्हा दोन्ही हातान मोडून टाके ती ताटात

काय वर्णवू त्याची गोडी

तिजपुढे थिटे पडे पंचपक्वान्न ते खाताच

 

काय वर्णवू माझ्या माऊलीची थोरवी

जरी शिक्षण असे थोडे

जगरहाटीचे ज्ञान मात्र आभाळाएवढे

खावी कमवून कष्टाची भाकर

नको कुणाचा हरामाचा पैसा अन धोतर

सांगे निक्षूण देवापुढे वात लावून

धरून पोटाशी ममतेने डोक्यावर हात फेरून

 

काय गाऊ माझ्या माऊलीची महती

होती जिंदा तेव्हा नाही समजली

जगाचे चटके सोसता सोसता

तिची थोरवी आज मज उमजली