आता धर्मालयात जायची भीती वाटते

 

आता तर मला मंदिर, मस्जिद अन चर्चमध्ये जायची ही भीती वाटते

न जाणो तिथे जाताच तिथला धर्मगुरू, त्यांचे चेले वा तिथले नौकरचाकर

अंगावर खेकसून साईड मे हो, बाजूला व्हा, दुरून नमस्कार करा

म्हणून हाकलून लावतील

 

 

तिथला प्रसाद ही मी घेत नाही

तिथे शिजत असलेल्या अन्नाच्या हंड्याजवळून

त्या हंड्याकडे न पाहताच, खाली मान घालून बाहेर निघतो

व बाहेरूनच तिथले धर्मगुरू, त्यांचे चेले, तिथले नौकरचाकर,

आजूबाजूचे फुल विक्रेते दुकानदार

व तिथल्या धर्मगुरूंसोबत मधुर समंध असलेल्या भिकाऱ्यांचे

त्या पवित्र वास्तूत मुक्तपणे संचार करीत स्वतःचे डब्बे भरीत,

थाळीतून खाली सांडेगत अन्न ताटात भरून हासत, खिदळत खात असलेले

व लोकांना, थोडा तरी हातावर प्रसाद मिळावा म्हणून

लांबच लांब रांगेत ताटकळत बसलेले

किळसवाणे प्रकार पाहतो

 

 

आता तर मी या धर्मालयातील धर्मगुरू, त्यांचे चेले,

तिथले नौकरचाकर, आजूबाजूचे फुल विक्रेते दुकानदार

व तिथल्या धर्मगुरूंसोबत मधुर समंध असलेल्या भिकाऱ्यांना खूप भितो

अन रस्त्याच्या कडेलाच उभा राहून

ही पॉवरफुल मंडळी आपल्याकडे तर पाहत नाही ना हा विचार करत

भीतभीतच या धर्मालयातील तेजात्म्यांचे दर्शन घेतो व पटकन तेथून निघतो