आधुनिक अंधश्रद्धा

 

सोशल मीडिया चाळता चाळता पडली एका पोस्टवर नजर

मन झाले क्षुब्ध, वाटले सुसंस्कृत लोकही पहा करतात कसा कहर

त्यात एका बहाद्दराने पोस्ट टाकली होती

ग्रह बिघडले असता मनुष्याला कोणते विकार जडतात

 

उत्कंठा वाढली मनी आणि वाचावयास लागलो, त्यात लिहिले होते

सूर्य कमजोर असता डोक्याचे विकार उदभवतात“,

चंद्र कमजोर असता डोळ्याचे विकार,

अन बुध कमजोर असता गळ्याचे,

गुरू कमजोर असता छातीचे,

शुक्र कमजोर असता त्वचेचे,

शनी कमजोर असता पाठीचे अन

राहू, केतू कमजोर असता उदभवतात विकार पोटाचे

अस वाटल हाणाव ह्याच्या कानपटात एक

 

परत पुढे दुसरी एक पोस्ट दिसली

त्यात एक तथाकथित डॉक्टर सांगत होता

जर तुम्हाला औषध लागत नसेल तर ते कोणत्या दिशेला ठेवावे

अरेरे, किती रे लाजिरवाणी गोष्ट

खरच हयांना डॉक्टर म्हणाव की समाजात अंधश्रद्धा पसरविणारे दृष्ट

 

ते तथाकथित डॉक्टर महोदय लायटिंगने सुशोभित केलेल्या धन्वंतरी देवाच्या

भल्यामोठ्या फोटोसमोर उभे राहून मोठ्या विनयाने सांगत होते

जर तुम्हाला औषध घेऊन ही बरे वाटत नसेल वा गुण येत नसेल

तर तुम्ही औषध ठेवण्याची जागा बदला

ऐकून नवलच वाटल, अहो जागा बदलून का त्या औषधाचा फॉर्मुला बदलणार आहे,

ते अजून प्रभावी होणार आहे, फारच खुळचटपणा आहे बुवा

 

मग त्यांनी औषध अंगी लागण्यासाठी ते कोणत्या दिशेला ठेवाव ते ही सांगितल

ते म्हणाले औषध कधीच दक्षिण दिशेला ठेवू नये

त्यामुळे ते किती ही घेतल तरी गुण येत नाही, व्याधी तशीच राहते

मग ते म्हणाले अशा वेळी औषध हे उत्तर किंवा उत्तरनेपच्युन दिशेला ठेवाव

त्यामुळे ते पटकन लागून वारंवार डॉक्टरकडे जाणे लागते टाळाव

अस वाटल चपलेने त्याला बडवाव, काही तरी बरळतात लेकाचे

अहो अपुऱ्या सूर्यप्रकाशात वा घाणेरड्या ठिकाणी ठेवल तरच

औषधांचा प्रभाव कमी होतोहे विज्ञानच सांगते

त्यात उत्तर अन दक्षिण दिशेचा प्रश्न आलाच कुठे

जेव्हा औषधे तयार केली जातात तेव्हा यंत्रसामुग्री,

वेगवेगळी पदार्थ ही सरकारच्या मानकानुसार निर्जंतुक करून

कुठल्याही दिशेला ठेवली असतात म्हणून का ती बेअसर होतात

 

खरच आपण किती अंधश्रद्धाळू आहोत,

आधी केवळ पूजा करतांनाच पंचांग पहायचो

आता तर ज्या दिवशी ऑपरेशन करायचे तो दिवस शुभ की अशुभ,

त्या दिवशी पौर्णिमा की अमावस्या,

त्या डॉक्टरची जात, ज्या शरीराच्या भागाचे ऑपरेशन करायचे आहे

तो भाग ज्या ग्रहाच्या अख्त्यारीत येतो तो दिवस वर्ज्य,

अमका अंक अशुभ म्हणून ती तारीख त्याज्य,

अरेरे, अंधश्रद्धेने चांगले पोळलेलो आपण, हाती महागडे मोबाईल,

लॅपटॉप, कानाला हेडफोन, चांगल्या ब्रँडचे कपडे अंगावर,

खिशात फुगलेले पैशाचे पाकीट, फक्त दिखावाच पहा

दवाखान्याच्या दर्शनी भागावरही दिसे विधिवत स्थापलेले

राम, रहीम अन येशू मसीहा