आम्ही भारतीय

 

आम्ही भारतीय

सूर्य, चंद्र, तारका, पशुपक्षी अन झाडे

यांची करतो वरकरणी फक्त पूजा अर्चा

पण अंतरीच्या वंशपरंपरागत रुजलेल्या

रूढी परंपरांना सदैव मस्तकी धारण करून

धरतीवरून सूर्याला देतो अर्ध्य,

चंद्रतारकांना ओवाळून आरती

त्यावर बोटाने उडवितो हळद, कुंकवाचे शिंतोडे

अन होळीला करतो अज्ञानाने

कापून झाडास स्वाधीन अग्नीच्या ज्वाळे

 

पाश्चिमात्य देशात मात्र

सूर्यापासून शोधती ऊर्जेचा श्रोत,

चंद्रतारकांवर बघती आहेत का

धरतीवर आणण्यास व जीवन सुकर करण्यास

खनिजे ओतप्रोत,

पशुपक्षांचे संवर्धन करून

शोधती पशुपक्षांच्या नव्या जाती

सांगती जगाला निक्षूण

कशी महत्वपूर्ण आहे अन्नसाखळी

झाडांची निगा राखून वाढविती प्राणवायूची पातळी

त्यापासून काढून जडीबुटी

सांगती हे आहे वरदान निसर्गाचे मानवासाठी

 

आम्ही सणावारांना

नवीन वस्त्रे लेवून अन सुशोभित होऊन

वरपांगी केवळ करतो पूजा

व केवळ सणमात्रे लावितो त्यांना लळा

व मनाच्या तमात अखंड डुंबून

स्वतःची भरभराट होण्याकरिता

अंधश्रद्धेने देऊन त्यांची आहुती

चिरतो त्यांचा गळा

 

केवळ नावाचीच माणुसकी आमची

अन केवळ नावाचीच सुशिक्षितता आमची

नसे आमच्यात माणुसकी

शुल्लक कारणांसाठी भांडतो आम्ही,

एकमेकांच्या जीवावर उठतो आम्ही

ऐहिक सुखासाठी झाडे तोडतो आम्ही

पशुपक्षी मारून त्यांचे मुडदे घरात सजवितो आम्ही

 

आम्ही केवळ नवे कपडे घालून,

महागड्या मोटारी फिरवून झालो सुशिक्षित

अन फिरतो मदारीच्या माकडासारखे

माकडचेष्टा करीत निपचित

जातीभेद, आरक्षण, अंधश्रद्धा अन गरिबी,

याचे सदैव मानगुटीवर असे भूतपिशाच शापित