रस्त्याने जातांना मला एका झाडाखाली
दिसली लक्ष्मीपूजनास आणलेली लक्ष्मीची मूर्ती बेवारस ठेवलेली
अगतिकपणे जाणाऱ्या येणाऱ्यांना केवीलवाणेपणे पाहत असलेली
होती आजूबाजूला घाण साचलेली, दुर्गंधी येत असलेली
पण ज्यानेही ती मूर्ती होती तिथे ठेवली, त्यास बद–दुवा देत असलेली
सांगत होती मजला ती मोठ्या उत्साहाने
मला माझ्या मालकाने वाजत–गाजत घरी आणले,
ब्राह्मणांच्या हातून पुजून देव्हारी बसविले
समोर पैशाची, सोन्या–नाण्यांची रास ठेवत स्तुतीसुमने गायिले
अन लक्ष्मीपूजनाचा दिवस सरताच
दुसऱ्या दिवशी मज असे भर बाजारात आणून बसवले
ऐकून वाईट वाटले, अहो जिला आपण लक्ष्मीमाता म्हणतो
तीच आता अगतिक होऊन माणसाला मालक संबोधित होती
पाऊस पडत होता, मूर्तीस चिंब करत होता
पावसाने मूर्तीवरचा रंग निघत होता, माती वितळत होती
अन मूर्ती भंगत होती
घिन्न आली अशा माणसांची जे देवीदेवतांना कचऱ्यात फेकून देतात
अरे जे आपल्या इष्टदेवींची, कुलदेवीची अशी धिंड काढतात
खरच काय ते आपल्या माय–बहिणींची गय करतात ?
त्यांस ही लाथा–बुक्यांनी मारून, उपाशी–तापाशी ठेवतात,
‘दहेज‘ दयावा लागेल म्हणून गर्भातच मारून टाकतात,
कुणाच्या लेकीबाळीवर वाईट नजर ठेवून अब्रू लुटतात
अन नवरात्रात नऊ दिवस उपास ठेवून ” माता की जय ” म्हणतात