काल रस्त्याने जातांना रस्त्याच्या कडेला एका चबुतऱ्यावर
महात्मा गांधींचा कंबरेला पंचा नेसलेला,
चरख्यावर सुत कातत असलेला पुतळा दिसला
त्या पुतळ्याखाली एक भिकारी उष्ट अन्न खात होता
त्याच्या बाजूलाच जागोजागी कपडे फाटलेला
एक पंचर दुरुस्त करनेवाला बसला होता
पुतळ्यावर कावळे काव काव करीत बसत होते
अन कोणी रस्त्याने जाणारे आपल्या वाहनातून
त्या पक्षांकडे स्वतःजवळचे खाद्य पदार्थ फेकताच
आधाश्यासारखे ते चोचीत पकडण्यासाठी उडत होते
समोरून भरधाव महागड्या गाड्या,
नवीन कपडे घातलेले तरुण–तरुणी आपल्याच मस्तीत
हास्यविनोद करीत जात होते
अन हे बापडे गरीब भिकारी
केवीलवाणेपणे त्यांच्याकडे पाहत होते
काळ बदलला होता, अंतराळात झेपावला होता
पण देशाची परिस्थती मात्र बदलली नव्हती
अजूनही लोकांना धड पोटभर खायला मिळत नव्हते
अन अंगावर घालायला दोन चांगले कपडे मिळत नव्हते
अन महात्मा गांधी एकविसाव्या शतकातही कंबरेला पंचा गुंडाळून
“सबको सन्मती दे भगवान” म्हणत चरख्यावर सुत कातत होते