ऑनलाईन दर्शन

 

पहा त्या भगवंताला मनुष्याची किती काळजी आहे

सत्ययुगातल्या लोकांना तो जसा प्रसन्न होऊन,

पटकन प्रगट होऊन, क्षणात साक्षात दर्शन द्यायचा

तसाच प्रयत्न त्याने कलियुगातल्या भक्तांसाठी ही केला आहे

त्याला माहित आहे मनुष्य खूप बिझी आहे, नाही त्याच्याजवळ वेळ

म्हणूनच त्याने नवीन शक्कल शोधून ऑनलाईन दर्शनाची केली सोय

 

 

आता एका कॉम्प्युटरच्या क्लिकवर

जगातल्या कोणत्या ही देवाचे ऑनलाईन दर्शन घडते,

लिंक ओपन करून घंटीवर क्लिक केल्यास, घंटीचा आवाज ऐकू येतो,

शंखाला स्पर्श केल्यास शंखनाद ऐकू येतो,

फुलाला स्पर्श केल्यास साक्षात देवावर, मजारीवर पुष्पवर्षाव होतांना दिसतो

अन भजन किंवा कव्वालीच्या आयकॉनला स्पर्श केल्यास

शानदार भजन किंवा कव्वालीचा स्वर कानावर पडतो

 

भगवंता, खरच तू खूप दयाळू आहेस

किती आपल्या भक्तांची काळजी वाहतो

दूरवर तीर्थयात्रेला, उर्सला येऊन, त्यांना त्रास होऊन,

कोणाची आबाळ होऊ नये, हेच चाहतो

 

यातल खरखोट तूच जाणो देवा,

पण मला तरी वाटते कोणत्याही देवधर्माच्या तीर्थक्षेत्री

महिला, बालकांवर, भोळ्या नागरिकांवर होणारे अत्याचार पाहून

नको स्वतःची बदनामी म्हणून

तू हे ऑनलाईन दर्शन देण्याचे पाऊल

उचलले असावे जाणूनबुजून

 

तू अंतर्यामी आहेस, किती ही सबबी दे,

एवढे मात्र खरे नंगे से खुदा डरे