आम्ही मानवजात मोठी ओंगळवाणी
चांगल्या गोष्टींना, वस्तूंना, सृष्टीला
शुभशकुनाच्या साच्यात बसवून
त्यावर आपल्या अज्ञानाचे सोडतो पाणी
सूर्य, चंद्राला अमावस्येचे ग्रहण लावून
त्यांचा मुडदा पाडून, तिरडी बांधून
त्यांना वेध लावून सुतक पाळतो
वडासारख्या वटवृक्षावर भुतांना नांदवून
तयास त्यांचे घर संबोधतो
घुबड, वटवाघूळांना अशुभ मानून
त्यांचा नुसता स्पर्श झाला तर
अंगावर गोमूत्र शिंपडतो
देवालये, दर्गे या ठिकाणी
भगवंताची आराधना/इबादत करणे सोडून
करणी, कवठा, अंगातून भूत काढण्यास प्राधान्य देऊन
त्यासाठी तिथे जाण्यास धन्यता मानतो
अहो इतकेच काय,
आम्ही संध्याकाळच्या शांत निवांत हवेस ही बक्शल नाही
त्यातून ही आम्हाला भूतबाधा होते
नदया, ओढे, विहिरी यांच्यावर ही आमची वक्रदृष्टी
त्यांच्या पाण्यात न्हावून करून घेतो भूतापासून, पापापासून मुक्त्ती
स्वतःच्या सुखासाठी, बरकतीसाठी
दरवाज्यावर टांगतो लिंबा–मिरच्यांचे तोरण
दुसऱ्या दिवशी ते तोडून भररस्त्यात फेकतो
कोणी जाता ते ओलांडून
व्हावा आपला लाभ व दुसऱ्याचे नुकसान म्हणून
आम्हाला प्रत्यक्ष भगवंताने ही येऊन वरदान दिल
तर त्यावर घेऊ शंका
खोटा बोलला म्हणून, त्यास ही देवू मार जनावरासारखा