सुशिक्षित झालो तरी कळत नाही आम्हाला
धर्मग्रंथात लिहिलेल्या शब्दांचा अर्थ
मोकाट जनावरासारखे इतरांना शिंगे मारत
करून रक्तबंबाळ उनाडासारखे फिरतो
धर्मग्रंथ शिकवितो ईश्वरापुढे सारे समान
कुणालाही कमी लेखू नका, द्या प्रत्येकाला मान
आम्ही देवाची लेकरे, ना कोणी मोठा न लहान
हेच ते धर्मग्रंथाचे मर्म अन त्यातले ज्ञान
आम्ही शिकून ही “काला अक्षर भैस बराबर“
“संकटात करावा धावा देवाचा” लिहिले असते पुराणात
मात्र आम्ही, ग्रहणाला ठेवतो देवाची दारे बंद,
ना भजन, कीर्तन, वा उच्चारत पोथीतला कुठला छंद
देवाला दुधा–तुपाने न्हावू घालतो, भरजरी वस्त्रे नेसवतो,
पंचपक्वान्नाचे जेवण काय देतो, एवढेच नव्हे
उन्हाळ्यात A.C., कुलरची हवा देऊन
हिवाळ्यात त्याला उबदार स्वेटर ही घालतो
अरेरे, किती वेंधळे आम्ही
ज्याला आपण सुखकर्ता, दुःखहर्ता म्हणतो
त्यालाच आपण मूर्ख मानतो, हरभऱ्याच्या झाडावर चढवून
धापकन खाली पाडतो
देव, धर्म हा हारलेल्या मनावर आशेची फुंकर आहे
अंधश्रद्धा बाळगू नका, डोळस बना,
लोककल्याणासाठी झटा हे सांगण्यासाठी आहे
करा सगळ्या अविचारांची होळी
करा उधळण सर्वधर्म रंगांची
वाट चोखाळा आपुलकीची
तेव्हाच उजाडते पहाट सुखसमृध्दीची