माणसाच्या रक्तारक्तात, रोमारोमात देव भिनला आहे
वांगे, बटाटे कापले अन त्यात का चौकोनाचा आकार दिसला
तर म्हणते साक्षात “स्वस्तिक” साकारले
कोणत्या फुलाच्या परागकणाने अथवा कळीने वाकडा आकार घेतला
तर म्हणते फुलात “गणपतीची सोंड” साकारली
म्हणजे साक्षात घरी गणपती अवतरले
मग ते फुल अन भाजी न चिरता न फेकता
मोठ्या भक्तिभावाने पूजेत ठेवून, त्याची मंत्रोच्चारात पूजा करून,
गावभर प्रचार करून, वर्तमानपत्रात त्याचे फोटो प्रसिद्ध करून
“freeze” मध्ये preserve करून
देवाने साक्षात त्यांच्या घरी जन्म घेतला असे भासवितात
एवढेच नव्हे “Pedestrian Street” वर असलेल्या एका छोट्या गड्डयात
एक छोटासा दगड रंगवून, आजूबाजूला रंगरंगोटी करून,
“महादेवाची पिंड” म्हणून नामकरण करून
अनाथ दगडाला ही राजा–महाराजाच स्वरूप प्राप्त करून देतात,
कुण्या अपराध्याच्या शेकडो वर्ष जुन्या तुटक्या–फुटक्या कबरीला
“बाबा कंबलपोष” नाव देऊन
“मुराद पुरी करनेवाला” दर्ग्याच स्वरूप प्रदान करून देतात
वा कुण्या सरकारी इमारतीच्या कम्पाऊन्डच्या भिंतीवर एक “क्रॉस” काढून
त्यावर पांढरे तलम वस्त्र हवेवर तरंगत असल्याचे चित्र काढून
“Jesus Loves You” म्हणून सांगतात
अन हे सर्व देव, मजारी व कम्पाऊंडचे चित्र पाहून
लोक भीतीने त्याला झुकून मानवंदना देऊन,
काही पैसे त्यांच्यासमोर फेकून ही जातात,
लोक ही त्याठिकाणी बसण्यापूर्वी आपली पाठ
त्या देव, मजार अथवा “क्रॉस” समोर होणार नाही याची काळजी घेत
दोन–तीन फूट जागा सोडूनच बसतात
हे चांगल आहे बुवा, देव बनल की देवाला कायदयाच भय नाही
तो कुठेही बिनबोभाट अतिक्रमण करून, सरकारी इमारती रंगवून,
आपले अस्तित्व स्थापित करू शकतो
अतिक्रमण हटवितांना जातीधर्मात तेढ माजणार नाही यासाठी
ते काढण्याकरिता प्रशासन तथाकथित धर्ममार्तंडांची हाजी–हाजी ही करतो
ते पाहून दोन पैशाचा शेंदूर लावलेला देव गदागदा हसतो
शेवटी काय कुठेही मंदिर बांधा, दर्गे उभारा
नाही राहिला आता कुणाचा दरारा