कुणास नाही देव, धर्म अन कर्माची भीती
“देवांनीच तर ऋषीमुनींच्या बायका पळविल्या,
छल–कपट करून महाभारत घडविला“
पोथी–पुराणांचे दाखले देऊन लोक मोठे हसून सांगती
मंदिर–मस्जिदीत जाव
तर चपला–जोडे कोणी चोरून नेती
तिथे फुल, प्रसाद विकत असलेल्या दुकानदाराला
“वस्तू, वाहनांवर लक्ष दे” म्हणून सांगाव तर
ते समोरच्याला तुच्छ समजून चक्क नकार देती
अन त्यांचीच माणसे गाड्या लंपास करिती
देवापुढे अगरबत्ती लावून, फोटोला हात जोडून
लोक भक्तिभावाने घराबाहेर निघती
कुणाच आर्थिक, मानसिक नुकसान करून
स्वतःचा स्वार्थ साधती
“गणेश चतुर्थी” किंवा “लक्ष्मी पूजनाच्या” दिवशीच
दारू अन मटणाचा बार झोडती
दाखविली देवाची भीती तर “जे होईल ते पाहू” म्हणती
कुणास सांगाव “पाप केल्यास मिळतो नर्क“
तर ते “उदया कोणी पाहिले, आजच मजा करून घे” म्हणून देती तर्क
लोकांनीच केला आहे देवाला गुळाचा गणपती
स्वतःच्या फायद्यासाठी मुंगळ्यासम त्यासमोर ते जमती
कुणाला ही आता देव–धर्माची भीती नाही
त्यांना माहिती आहे “खरा देव पैसा आहे“
त्यान ते मोठ्यातल मोठ पाप ही झाकती