केवळ नावेच मोठी

 

दयाळा, विघ्नहर्ता, अनाथांच्या नाथा

नावेच तुझी खूप मोठी

अन मनोकामना पूर्ण करण्यास

होमहवन, पूजाअर्चा, दानधर्म करण्याचे सांगून

आश्वासने देशी खोटी

 

तुझ्याबद्दल अशी ख्याती, तू आहे निर्मोही

तुला नसे मोह कपड्यांचा, दागदागीण्यांचा

वा नको असे हरामाची रोटी

पण तुझी कथनी अन करनी वेगळी

दर्शनाच मोल अन आशीर्वादाचे फळ म्हणून

तुझ्या पायथ्याशी असे भलीमोठी दानपेटी

 

तू तर वैगुण्यमूर्ती

नसे तुला आकार वा आकृती

ऊन, पाऊस अन वारा

तुला तिन्ही सारख्याच प्रकृती

पण दिसते चित्र मोठे वेगळेच

अंगी भरजरी वस्त्रे, पुढ्यात पंचपक्वान्नाचे ताट

अंगावर चंदनाचा घाट

अन समोर बडव्यांचा थाट

 

देवा, नको रे थट्टा करू

भोळ्याभाबड्यांची, दुःखीतांची

कर मनोकामना पूर्ण निःस्वार्थपणे

पूजतात तुला जे भाविक मनोभावे त्यांची