कोणी म्हणते म्हणून

 

कोणी म्हणते म्हणून

मी का देऊ माझी आहुती अग्नीत

का ? मी त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून

का म्हणून करून घेऊ मी माझे वस्त्रहरण

कुणी घेतली चारित्र्यावर शंका म्हणून

 

का कुणाच्या शापाने होऊ मी शिळा

 

जरी असेल मी अबला

पण आज आहे उच्चशिक्षित

आहे सामर्थ्य माझ्यात

हातांच्या अग्निपंखांनी

त्या रवीच्या अग्नीला क्षेपणास्त्रात बसवून

उपग्रह सोडून आकाशी

त्यांना त्यांच्या भोवती फिरविण्याचे

 

का म्हणून कुणी माझ्या अब्रूचे धिंडवडे काढील

मी आहे धनुर्धर, मुष्टीयोद्धा अन नेमबाज

आहे माझ्यात बुद्धिबळ

नमवून समोरच्याच्या प्याद्याला

करून चार ही खाणे चीत हरविण्याचे

आहे माझ्यात सामर्थ्य स्पर्धा गाजविण्याचे

 

का म्हणून मी ऐकू कुणाचे उणेदुणे

का कुणी म्हणते म्हणून जगू पाषाणासारखे जिणे

माझ्यातच आहे कौशल्य शापाला उ:शापात बदलण्याचे

घेऊन गगनभरारी स्वबळे

दाखवून कर्तृत्व

करून नामोहरण

समोरच्याला स्तंभित करण्याचे