खरच मानव जर देव असता

 

खरच मानव जर देव असता

तर नसती मस्जिदे, गिरिजाघरे अन देवालये

नसती पापपुण्याची संकल्पना

वा नसती बुवाबाजी अन अंधश्रद्धा

नसती मोठमोठाली देवालये अन गिरिजाघरे

त्यात नसती मोठमोठ्या मुर्त्यांची तसबिरे

न लावावी लागली असती रांग दर्शनासाठी

वा घ्यावे लागले असते दर्शन पैसे देऊन

 

खरच मानव देव असता

तर नसत्या लांड्या लबाड्या वा चोरी चपाट्या

नसती भांडणे वा रक्त सांडणे

 

खरच मानव देव असता

तर नसती वृद्धाश्रमे वा अनाथालये

हेवेदावे अन कुणास ठेवणे नावे

नसती पोलीस ठाणे अन न्यायालये

 

खरच मानव देव असता

तर नसती बळजबरी वा अबलेवर अत्याचार,

व्यभिचार वा भिणे

आले असते निर्भय जिणे

 

खरच मानव देव असता

तर नसती पैशाची चलने

वा कायदेशीर लेख लिहिणे

नसती भाऊबंदकी

वा काळजीयुक्त जिंदगी

 

खरच मानव देव असता

नसता जातीभेद वा प्रांतवाद

एकूण अंतर्मनाची साद

विश्वकल्याणार्थ असता झिजला

देऊन हातात हात

 

खरच मानव देव असता……..