ग्रहांच्या अंगठ्या घालून नका वाढवू वजन

 

जगातली सारी धर्मग्रंथे सांगतात

सत्कर्मे करून आपले वजन वाढवा

परंतु आम्ही मानवजात

दहाही बोटात दहा तांबा, पितळ,

लोह, सुवर्ण अन रजताच्या घालून अंगठ्या,

त्यात बसवून जास्तीत जास्त रत्तीचे ग्रहांचे महागडे खडे,

मानेवर वेगवेगळ्या रंगाचे, आपल्या धर्माच्या देवाचे नाव लिहिलेले गमचे,

गळयात घालून स्फटिकाच्या, रुद्राक्षाच्या,

मांजरीच्या, वाघाच्या डोळ्यांच्या मण्यांच्या माळा

कानात अन पायात टाकून वेळवेगळ्या धातूचे रिंगण

दाढीमिश्या अन जटासंभार वाढवून वाढवितो वजन आपल्या शरीराचे

 

एवढेच कमी की काय

कपाळावर, दंडावर कुंकू, चंदन, अष्टगंधाचे लावून टिळे

छटाकभर अजून वाढवितो वजन आपल्या देहाचे

असा सजून सर्कशीतला जोकर हासे करून घेतो स्वतःचे

जणू देवालाच खरिदल या आविर्भावात इतरांना तुच्छ लेखत

गर्वाने वाढवितो वजन आपल्या मढ्याचे

पण त्याला हे कळत नाही, गरिबांना मदत करावी,

भुकेल्यांना दोन घास खाऊ घालावे, प्राणीमात्रावर दया करावी,

इतरांच्या चहाड्या करू नये, असे केल्यानेच

माणसाची पत वाढून, सार्थक होते जन्माचे

 

अगदी वेडा आहे हा

अरे कशाला हे असे अवडंबर करावे लागते

करा मानवतेची सेवा, नका लेखू कमी इतरांना

एक दुसऱ्याच्या सुखदुःखात सामील व्हा

करा प्रत्येकाचा सन्मान

तेव्हाच वाढते माणसाचे वजन व त्यालाच मिळतो देवा दरबारी मान