हे जगातले सर्व शास्त्रज्ञ महाशय हो, तुच्छ विनंती माझी तुमच्या चरणी
शोधा हो असा एक रिमोट, ज्याचे दाबता एक बटन
ब्रम्हांडातल्या सर्व ग्रह, तारे अन नक्षत्रांना
जिथे वाटले तिथे करता येईल वहन
आता कंटाळलो हो या सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांना
कुंडली पाहून राहू, केतू, शनी, मंगळाची भीती बाळगणाऱ्यांना
सकाळी उठताच हे पहिले टी. व्ही. वर भविष्य ऐकतात
अन त्यात का कुणा भविष्यवाल्याने सांगितल
तुमच्या राशीला शनी वक्री होणार आहे,
मंगळ पापग्रहांशी युती करणार आहे,
अन त्यामुळे तुमच्या जीवनात फार मोठी उलथापालथ होणार आहे
तोच ही सारी तथाकथित सुशिक्षित बालके घाबरतात
तो भविष्यवेत्ता पापग्रहांना खुश करण्याला काय उपाय सांगतो
हे डोळ्यात तेल ओतून जातक ऐकतात व डोळे मिटून तसेच उपाय करतात
शुचिर्भूत होऊन पटकन जातात आपल्या गावातल्या बाजारू ज्योतिष्याकडे
अन त्याला घाबरून सांगत विनंती करतात “माझे ग्रह बदलणार असून,
त्यायोगे होणाऱ्या वाईट परिणामांपासून माझी मुक्त्तता करा” म्हणून
स्वतःहूनच माकडाच्या हाती कोलीत देतात अन आपल्या मूर्खपणाचा कळस गाठतात
ग्रह–ताऱ्यांचा फेरा चुकविण्यासाठी उपाय सांगा म्हणून साकडे घालतात
आपला जीव वाचविण्यासाठी, आपल्या सुखासाठी, अघोरी कृत्ये करून
रात्री–बेरात्री स्मशानात सडकछाप मांत्रिकाच्या हस्ते तंत्र–मंत्र पूजा करतात,
पशु–पक्षांचा बळी देतात अन मंतरलेले लिंब, मिर्च्या शेजारच्या अंगणात फेकतात,
सत्कर्मे करण्याऐवजी देवाजवळ घाबरून माळ जपत बसतात
हे जगातल्या सर्व शास्त्रज्ञाननो पाय पकडून विनंती करतो हो तुम्हाला
बाकी तुम्ही करत असलेले तुमचे दुसरे प्रयोग सध्या लांबणीवर टाका
पण ग्रह, तारे अन नक्षत्रांना वश करता येईल असे एक रिमोट तात्काळ शोधा
अन प्राणिमात्रांवर कृपा करा, त्यांचा बळी जाण्यापासून वाचवा
तुमच्या हया महान शोधाने जगाचे फार भले होईल
प्रत्येक मनुष्य तुमच्याकडे येईल, तुम्हाला आपल्या कुंडल्या दाखवून
त्यात चांगले ग्रह ठेवण्यास सांगून, वाईट ग्रहांना ब्रम्हांडाबाहेर हाकलून देता येईल
सगळेच ग्रह कुंडलीच्या चांगल्या घरात रिमोटद्वारे ठेवता येत असल्याने
जगातल्या साऱ्या लोकांच्या जीवनात सुख शांतता नांदेल
व त्यांचे भविष्य, कुंडल्या पाहणे तरी निदान थांबेल
हे शास्त्रज्ञ देवतांनो तुम्ही ही थोडा विचार करा
कोणत्या धर्मक्षेत्री पूजापाठ केल्यापेक्षा, कोणाला दान–दक्षिणा दिल्यापेक्षा
अन एवढ करूनही वर्षोगिणती ग्रह बदलण्याची वाट पाहिल्यापेक्षा
मनुष्यप्राण्यांना शास्त्रज्ञान जवळ जाऊन, त्यांची फी देऊन,
क्षणात वाईट ग्रहांची चाल रिमोटद्वारे बदलून आपले जीवन घेता येईल उजळून
शास्त्रज्ञाननो थोडा परिश्रम करा व लोकांच्या बुद्धीवरची अज्ञानाची धूळ बाजूला सारा