जगात कुठे ही पहा, कुठल्या ना कुठल्या रूपात
मनुष्य अंधश्रद्धा बाळगतोच
कोणी ‘१३‘ हया आकड्यास अशुभ मानतो
तर कोणी ‘७८६‘ हा नंबर मिळावा म्हणून भांडतो
कोणी रस्त्यात मांजर आडवी जाता थोडा थांबतो
तर कोणी आकाशातल्या तुटत्या ताऱ्याला शुभ जाणतो
कोणी पूर्व दिशेला प्रगतिकारक समजतो
तर कोणी दक्षिण दिशेला पनवती म्हणून हिणवतो
आकाशाआड स्वर्ग, जन्नत, हेवन आहे हे मनी बिंबवत
तिथे जाण्याची कामना करतो
तर कोणी जमिनीवरच्या अंधाऱ्या खोल दरीकडे पाहत
तळाशी नर्क, जहन्नुम, हेल आहे म्हणून नाक मुरडतो
पांढऱ्या रंगापुढे कोणी नतमस्तक होतो
तर कोणी काळ्याकुट्ट काळोखात भुताटकीचे खेळ करतो
अमावश्येला शुभ कर्मे करणे त्यागतो
तर पौर्णिमेला धरतीवरून चंद्राला आरतीने ओवाळतो
कोणी धर्मग्रंथातले दोन चांगले विचार अंगी बाणतो
तर कोणी ते द्वेषपूर्ण आहे म्हणून जाळतो
कोणी “मी आणि माझा संसार” इतक्यावरच रमतो
तर कोणी “अवघे विश्वची माझे घर” म्हणून
सर्वांविषयी आपुलकी बाळगतो
कोणी मखमलीच्या पलंगावर लेटून आकाशीचे तारे मोजतो
तर कोणी कष्ट करूनही शांततेत जमिनीवर झोपतो
कोणाला कोणाचा स्पर्श सहन होत नाही, तर कुणाला कुणाचा उत्कर्ष
कोणी परमेश्वराला “सगळ्यांचच भल कर म्हणतो“
तर कोणी त्याच परमेश्वराला “दुसऱ्याच वाईट कर” म्हणून गळ घालतो
मोठा अतर्क्य आहे माणूस, काय म्हणावे त्याला
गिरगिटासारखे रंग बदलतो, लोभापायी “कौए की चाल” चालतो