जातीचे धिंडवडे

 

ब्राह्मणांचा त्रिशूल, क्षत्रियांचा फरशा, नाव्हयाचा वस्तरा

का असे म्हणून जातीचे धिंडवडे काढता

वेगवेगळ्या गटात विभागून,

वेगवेगळ्या रंगांचे झेंडे फैरावून

शुल्लक कारणांसाठी सभा भरवून, वेगवेगळ्या जातीचे मोर्चे काढून,

इतिहासाचा अन्वयार्थ लावून, तोडफोड, शिव्यागाळी करून

अस एकमेकांच्या अंगावर पचकन थुंकता

 

अरे, त्यापरीस असलेल्या संधीचा फायदा घेऊन,

आपापल्या समाजाचे जीवनमान उंचावून

हर एक क्षेत्रात आपल्या समाजाचा अमिट ठसा उमटवून

केल त्यापेक्षा ही अधिक चांगल करण्यासाठी सभा भरवून,

आपल्या समाजातील लोकांच्या कल्याणासाठी,

मार्गदर्शन करण्यासाठी जमा होऊन,

प्रत्येक समाजाच्या माणसान आपला समाज

आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात

एकमेकांच्या समाजाच्या पुढे कसा जाईल यासाठी प्रयत्न करून

भगीरथ प्रयत्ने मानव जेव्हा स्वतःस वाल्याचा वाल्मिकी करेल

तेव्हाच या देशातून होऊन जातीचे निर्मूलन

होईल निर्मळ, जन गणांचे मन