जातीची विषवल्ली आपल्या समाजात फार खोलवर रुजली आहे
जो तो येतो व आपली जात शोधण्याचा प्रयत्न करतो
अन माझी जात कशी मागासली हे सांगून
जातीचा फायदा मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो
काही चतुरलोक करून त्याचे भांडवल
त्या विषवल्लीच्या मुळाला खतपाणी घालण्याचे काम करतात
त्यास नवी पालवी फुटवून, तीस जमिनीत खोल रुजवून
गरीब–सामान्य जनांच्या मनात खोट–नाट बिंबवून
अजून एका नव्या सामाजिक घटकाला
जातीविषयक फायदे मागण्यासाठी भडकवून
त्याचे वटवृक्षात रूपांतर करतात
अन त्या वटवृक्षावर भुतासारखे बसून,
जातीयतेच्या वणव्यात भरडणाऱ्या लोकांच्या
टाळूवरचे लोणी खात गम्मत पाहतात
पिढ्यानपिढ्या आपण जातीधर्माच्या वणव्यात होरपळत आलो आहे,
आपल्या भाऊबंदाची आहुती देत आलो आहे
अन हे वणवे लावणारे संधीसाधू आपले मायबाप बनून
आपल्या जातिबांधवांच्या मुडदयावर पाय ठेवून
राजेशाही जीवन जगत आहे
अहो, आपली जात मागासलेली,
आपल्या जातीला फायदा मिळाला पाहिजे
हे जर आपल्याला समजते
तर मग आपल्याला जातीच्या भांडणात गुंतवून ठेवणारी स्वार्थी मंडळी
आपल्या जातीसाठी काहीच करत नाही, नाहक आपला बळी देतात
हे का नाही समजत ?
जर खरच असाल दिलोदिमाग से सुशिक्षित
तर हयावर थोडा तरी विचार करा
अन हया जाती–धर्मात तेढ माजविणाऱ्यांना नका देऊ थारा