टेम्पल सिटी

 

अरे मुर्दाडा हो

काय स्वतःच्या शहरास टेम्पल सिटीम्हणून वर्णिता

वा का ? देवालये बांधून टेम्पल सिटीवसविता

अरे काय मिळते त्या देवालयात जाऊन,

व्ही. आय. पी. वा व्ही. व्ही. आय. पी. च्या भल्यामोठ्या देणग्या देऊन

घेतलेल्या तिकिटात दर्शन घेऊन वा

जबरदस्तीने, भीती दाखवून पूजा माथी मारणाऱ्या देवांच्या दलालांचे

भरगच्च दक्षिणा देऊन लाड पुरवून

अरे त्यापरीस अंतराळाचा वेध घेणाऱ्या वेधशाळा बांधा

 

देव, अल्ला वा मसिहास तर मी या देहे पाहिले नाही

परंतु पाहिली आहे पराकोटीची गरिबी अन बेकारी,

सुशिक्षित अन उच्च शिक्षितांची

डिग्री घेऊन नौकरीसाठी उंबरठे झिजवून होणारी पायपीट

व सरस्वतीची होणारी हेळसांड मी पाहिली आहे

नौकरी मिळविण्यासाठी किंवा कुठल्याही चांगल्या वा वाईट कामासाठी

पैशाचा अपव्यय वा त्या योगे होणारी लक्ष्मीची कुचंबणा मी पाहिली आहे

मुलास नौकरी मिळावी वा मुलांच कल्याण व्हाव म्हणून

त्या विधात्यापुढे झुकणारे, सजदे करणारे मातापिता

व त्या योगे डोळे मिटून, हातपाय दुमडून

निश्चल, निर्विकार बसलेले जगत्पिता मी पाहिले आहे

 

अरे ज्यास आम्ही विद्या, धन अन सुखसमृद्धीचे कारक अन सर्वेसर्वा मानतो

तेच जर असे दिनहीन, लाचार होऊन असतात

तर काय कामाची त्यांच्या प्रती असलेली आस्था अन निष्ठा

 

मित्र हो, देणग्या दया पण त्या समाजोध्दारासाठी

इमारती अशा उभारा की त्यात कुणी दुःखी, पीडित शिरताच

तो बाहेर येईल पुरता बरा होऊन, पूर्ण कायापालट होऊन

मित्र हो, आज आपल्यास गरज आहे विज्ञानाची,

ज्यास दोन वेळेस पोटभर मिळत नाही त्यास दोन घास खावू घालण्याची

 

उठा, ज्याप्रकारे मंदिरमस्जिदीसाठी कारसेवा करता,

झुंडीच्या झुंडी बनून फिरता,

एक एक विट, एक एक पैसा कुण्या देवाच नाव त्यावर लिहून, कोरून दान देता

त्यापरीसच विज्ञानाच्या शक्तीमागे झुंडीच्या झुंडी बनून फिरा,

प्रयोगशाळा, दवाखाने बांधण्याकरिता एक एक विट, एक एक पैसा

माणुसकीच नाव त्यावर कोरून दान दया

 

कशाला सरकारकडे बोट दाखवायच

वर सांगितल्या गोष्टीयोगे कसा बदल घडतो ते तुम्हीच पहा