ठेवा आपला धर्म आपल्या पुरता मर्यादित

 

माझा भगवंत आहे माझ्या हृदयात, माझ्या मनाच्या गाभाऱ्यात

करून पूजा, प्रार्थना, अर्चना अन दीपार्चना मनोभावे पुजतो तयाला घरात

होऊ न देता त्रास इतर कुणा, वाजवून घंटा पठतो मंत्रपुष्पांजली सौम्य स्वरात

 

जेव्हा निघतो बाहेर, दिसता दर्गा वा मशीद झुके आदराने माझा माथा

दिसताच चर्च मन भरून येई अन आठवे प्रभू येशू सोबत झालेली क्रूरता

पडता दृष्टी भव्य स्तूपा दिसे गया, नालंदा अन वटवृक्षाखाली ध्यानस्थ तथागता

 

खूप आदर तयांविषयी माझ्या मना, तिळभर ही जागा नसे संशया

मज जैसेच ईतर धर्मीय ही पुजती त्यांचे इष्ट जाऊन आपापल्या देवालया

उर भरून येई जेव्हा दिसे परमात्मा विराजमान प्रत्येकाच्या हृदया

 

ठेवा आपला देवधर्म आपल्या पुरता मर्यादित, नका कुणावर लादू रे

व्रतवैकल्ये, प्रेअर, रोजे, नमाज करा घरातच कुटुंबासवे साजरे

परमात्मा सगुण निर्गुण सबका मालिक एक“, रूप त्याचे मोठे गोजिरे

 

पाण्यासवे मिसळावे एकजीव होऊनि प्रत्येक रंगा, नसावी भिन्नता

ठेवावा प्रत्येकाशी सलोखा, नसावी वागण्यात कृध्यता

जगावे आयुष्य बुध्दासारखे, तेव्हाच जीवनात नांदेल शांतता