आज रस्त्याच्या कडेला मला देवाचा मुडदा पडलेला दिसला
मंदिर तोडून, शेंदूर लावलेला एक मोठा गोटा,
अतिक्रमण तोडू दस्त्याने बाजूला फेकला होता
लोक रस्त्याने जात–येत होते,
कोणी पचकन तिथे थुंकत होते
पण तो रस्त्याच्या कडेला बेवारस पडलेला
शेंदूर माखलेला गोटा पाहून
कोणाचे मन द्रवत नव्हते
कोणी त्याला भक्तिभावाने नमस्कार करीत नव्हते
तो अनाथ मुडदा बिचारा, त्यावर माशा भिनभिनत,
रस्त्याच्या कडेला कडकडीत उन्हात पडला होता
जेव्हा अतिक्रमणाच्या जागेवर मानवाने मंदिर उभारले
अन त्यात त्या शेंदुराच्या गोट्याची प्राणप्रतिष्ठापना केली
तेव्हा काही स्वार्थ त्याच्या मनात होता,
स्वतःच्या फायद्यासाठी मानवाने देवाचा उपयोग करून घेतला होता
परंतु हेतू सफल न होताच
अन अतिक्रमण तोडू दस्त्याने मानवाचे स्वप्न भंग करताच
मनुष्य देवाला वाऱ्यावर सोडून पळून गेला
किती स्वार्थी आहे बघा मानव
आपल्या स्वार्थासाठी देवाला ही गंडवितो
अन बळीचा बकरा बनवितो