देवाचे हेर

 

पुजारी, पाद्री वा खादिम काय हे देवाचे हेर आहे

वा ललाटरेषा वाचणारे होर आहे

जणू यांनाच भगवंत आदेश देऊन, ग्रहताऱ्यांना छळण्यास सांगून

लोकांच्या नशिबाची परीक्षा पाहत आहे

 

जो तो पहा मंदिरमशिदीच्या उंबरठ्यावर डोक रगडतो आहे

देवळात टाळ्या वाजवून, दरबारी मस्तकी कपडा चढवून,

मनगटी मंत्रोक्त धागा बांधून, पाठी मयूरपंखी झाडूचा रट्टा सोसून

हस्तरेषा अन भालरेषा पुसतो आहे

 

हे उच्चशिक्षित भक्त्तभोळे पडतात कोणत्याही बाबाच्या पाया

नेतात त्यास घरी अन दाखवितात घरातील कानाकोपरा

बांधून, नारळ, हळद, कुंकू, बिब्याच्या पुरचुंड्या छतावर

पावतात समाधान विजय पावल्याचे भुताखेतावर

 

लग्न करायचे, घर बांधायचे घेती पहिले साधूचा सल्ला

कार्य निर्विघ्न पार पडण्या देती त्यास मोठा डल्ला

राहती सान्निध्यात फोनद्वारे त्याच्या, जरा काहीही मनाविरुद्ध होता,

अवसान गाळून फोनवर म्हणती सांगा हो उपाय ज्ञाता

 

कशाच शिक्षण अन कशाचा सुशिक्षितपणा, यांची फक्त शानच पहा

मांगलिक म्हणून गाढवाशी लग्न, नारायण नागबळी, काळसर्प पूजा,

गंगेत मृतदेह विसर्जन, लाज नाही वाटत हे करतांना

उर भरून येतो, यथाविधी पूजा केली सोवळ्यावर, म्हणून सांगतांना