मंदिर, दर्ग्यातल्या आवारात दिसतात
लोकांच्या पायदळी तुडत असलेल्या कोवळ्या कळ्या अन फुले,
जागोजागी अवयव तुटून–विखरून पडावेत तसे
नारळाचे मर्डर होऊन
करवंट्या, नारवंट्यांचे तुकडे जागोजागी विखुरलेले,
प्रसादावर “मॉब लिंचिंग” व्हावे त्यागत मुंग्या तुटून पडलेल्या,
आजूबाजूलाच असते कुण्या जनावराने घाण केलेली
का हो हेच पाहायला आपण देवळात, दर्ग्यात जातो अन
नाकाला रुमाल लावून त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेतो ?
घराचा कोनाकोना साफ करून,
साबणाने, फिनाईलने निर्जंतुक करून
स्वघरी भक्तिभावाने केलेली पूजा कमी पडते की काय म्हणून
आपण शहरातल्या/गावातल्या धर्मालयात जातो
पण तेथील अस्वच्छता पाहून मात्र
आपल्यातील निटनिटकेपणा जागृत होत नाही
नाकाला रुमाल लावून, तोंड वेडेवाकडे करून
तिथल्या तसबिरीला हात जोडतो
का हो मला सांगा, जेव्हा कोणत्याही धर्मालयात
तेथील अस्वच्छता, घाण पाहून तुम्ही तेथून
कधी दर्शन घेऊन बाहेर जातो अन कधी नाही असे करून घेता
अन देवासमोर त्याला नाक मुरडता
मला खरेच सांगा
असे वागल्याने देवाला राग येणार नाही का हो,
तो तुमच्यावर कोपणार नाही का हो
अशाने खरेच तिथला देव तुम्हाला पावेल का हो ?
मग आपल्यासारख्या सज्जनात
अन पाशवी वागणाऱ्या माणसात फरकच काय
नाजूक कळ्यांना, फुलांना माळ करून, देवाला श्रेष्ठत्व देऊन,
त्यांच्या गळ्यात कुसुमांना देवदासीगत सोडून देण
नंतर त्यांना कोणी कस ही तुडवो
त्याच्याशी आपल्याला काहीही नाही घेण–देण
आपण मात्र नवस फेडण्याच समाधान मानन
अन घरी निघून येण
कस हो हे आपल बेभरवशाच जीण !
बिचारा देव ही मानवाची ऍट्रॉसिटी सहन करतो
हि त्याच्या सहनशीलतेची परिसीमाच आहे
मित्र हो सुधरा, जस स्वतःच घर स्वच्छ ठेवता
तसेच कोणत्याही धर्मालयात गेल्यावर पहिले तिथला झाडू हाती घ्या
व तेथील अस्वच्छता झाडून साफ करा
म्हणजे तुम्हाला नाक मुरडून, तोंडाला रुमाल बांधून
दर्शन घेण्याची कुबुद्धी होणार नाही
व एकाग्र चित्ताने दर्शन घेतल्याने
परमेश्वराची कृपा ही होईल
माणूस बना नराधम नाही
जसे घरदार स्वच्छ ठेवता तशीच धर्मालये ही स्वच्छ ठेवून
देवावर होणारी ऍट्रॉसिटी टाळा, त्याला ही निर्भय मनाने जगू दया