म्हंटली स्तोत्रे, मंत्रे, गायिली भजने, आरत्या
अन केली किर्तने, प्रवचने
दाखविला नैवेदय दुधा–तुपाचा
अन उठविल्या पंगती देऊन भंडारा,
ओवाळिल्या दीपारती, फवारीले इत्र
अन लाविल्या अगरबत्ती
गेलो मंदिरी, मस्जिदी अन गिरिजाघरी
टेकविला माथा अन केले सजदे ,
केली प्रेअर क्रुसावरील येशुजवळी
फोडली नारळे, वाहली फुले
अन लावली दिवे अगदी मनोभावे
चिंतून हेच मनी, हे सर्व देवात्मे
करतील आपले सर्व चांगभले
गेले दिवस, महिने अन बरेच वर्ष
श्रद्धा बाळगत उराशी वाट पाहत थकलो
परी न देव दिसला कुठे
करिता विचार मनी हेच उमगले
मी जसा होतो पहिले दुःखात,
विचारात अन वेगवेगळ्या काळजीत
आहे आज ही तसाच
माझ्यात बदल घडविण्यास
न कुठला देव आला न त्याचा चमत्कार झाला
माझा मात्र पांगळ्यागत कुबड्या शोधण्यातच वेळ गेला
कळून चुकले कसला देव अन कसली त्याची रूपे
ही तर कमजोर मनोवृत्तीची लक्षणे
आणिले मनात तर, मीच तर माझ्यात बदल घडवू शकतो
मरगळलेल्या आयुष्याचे सोने करू शकतो
त्यास कशास हवा कुठला देव
फक्त इच्छा हवी मनी
शिक्षणाने प्रबुध्द होऊन, होऊन मेहनतीच्या अश्वावर स्वार
कुबेर स्वये होऊन सेवक, लक्ष्मी भरेल तुमच्या घरी पाणी