हे देव/पीरांनो आता तरी मौन सोडा, नाही जगातील समस्त लोकांकडे
निदान ज्या गावात तुम्ही मूर्ती/मजारी रूपाने तीर्थस्थळ म्हणून वावरता
त्या गावातील जनतेच्या, तुमच्या उत्सव, उर्स काळात होणाऱ्या,
गैरसोयीकडे तरी लक्ष वेधा
जेव्हा तुमचे उत्सव/उर्स असतात,
तेव्हा साऱ्या जगातले लोक तुमचे दर्शन घेण्यास उत्सुकतात
आपल घरदार सोडून, तुमच्या तीर्थस्थळी येऊन, तुमच्या भेटीची आस धरतात,
तुमच्या मंदिराची/दर्ग्याची पायरी चढतात, लाखोंची गर्दी होते,
धनिक जास्त पैसे मोजून वातानुकूलित हॉटेलात बसेरा करतात
अन गरीब बापडी मंडळी बिचारी रस्त्याच्या कडेलाच
आपले प्रातःकर्मे आटोपून रस्त्याचाच आसरा धरतात,
जागोजागी घाण साचून, दुर्गंधी पसरवत नाले–गटारे तुंबतात
केवळ तुमच्या मंदिर/मस्जिदीतल्या प्रसादालयातल्या
फुकटच्या प्रसादावरच लोकांची पोटे नसतात भरत
बिचारे अनवाणी, भगवान भरोसे, आपल्या बायको लेकरांना सांभाळत
तुझी करुणा भाकत, उपाशी असतात फिरत
त्यातच चोरांची भटकंती निघे सावज हेरत
अलगद खिशातून काढून मोबाईल वा पाकीट
वा बळजबरीने हिसका मारून तोडून गळ्यातले मौल्यवान दागिणे
आडदांड गर्दुले चोऱ्या करून बेदरकारपणे असती धूम ठोकत
जागोजागी पोलिसांची गस्त, बॅरिकेड्स लावून केले असतात रस्ते बंद
गावातील लोकांनाच त्यांच्या घरी जाण्यास असे पायबंद
करावी लागे त्यांना हुज्जत, दाखवून आयकार्ड सांगावे लागे
आम्ही या गावचेच आहोत भाऊबंद
हे देवांनो ! आता तरी समाधीतून जागे व्हा,
हे पीरांनो ! आता तरी मजारीतून उठून सभोवताली पहा
आता हे जग नाही राहील पहिले सारख,
आधुनिक तंत्रज्ञानाने झाल आहे सज्ज
नका बोलवू हो आता भक्तांना आपल्या धर्मस्थळी
त्याऐवजी त्यांना ऑनलाईन दर्शन घेण्याचे उतरवा गळी,
प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, त्यावर तुमचे “साक्षात दर्शन घ्या” म्हणून
सांगा हो तुम्ही भक्तांच्या स्वप्नात जाऊन
ऑनलाईन दर्शन घेतल्याने गावात गर्दी होणार नाही, घाण साचणार नाही,
चोऱ्या होऊन भक्तांचे नुकसान होणार नाही,
प्रशासन व पोलिसांवर कामाचा व्याप वाढून
त्यांच्याकडूनही कर्तव्यात कचुराई होणार नाही
बर हे परमेश्वरांनो, हया ऑनलाईन दर्शनाचा दुसराही एक फायदा आहे
जागच्या जागीच बसून, आयत थेट तुमच्या अकाऊंटलाच,भक्तांच डोनेशनही जमा होईल
व “पहा देवाला/पीराला आमची किती काळजी ऑनलाईन दर्शनाची सोय केली” म्हणून
भक्त्त सुखावून तुमची वाहवाही गाईल
तीर्थक्षेत्री असणाऱ्या देव/पीरांनो, विनंती करतो, आता तुम्हीही आधुनीक व्हा,
तंत्रज्ञानाचा स्वीकार करून, मौन धारण करून अंतराळात जाण्यापेक्षा,
डोळे उघडून तीर्थस्थळीच राहून
T. V., मोबाईल, सॅटेलाईटद्वारे ऑनलाईन साक्षात दर्शन द्या
व गर्दी सारून तुमच्या गावातल्या लोकांवरच कृपा करा