धरतीवरचे देव

 

लहानपणापासून ऐकल की

देव सर्वोच्च, सर्व शक्तिमान आहे

तो स्वतःच्या दिव्यशक्तीने

कुणाच्या मनात काय चाललय,

कोण पापी आहे हे जाणतो

व कुकर्म्याला त्याचा दंड देतो

देव म्हणजे जगत्कल्याणासाठी घेतलेले वेगवेगळे अवतार होत

ते आपल्या दोन्ही हातातील शक्तीने

वेगवेगळी दिव्यास्त्रे फेकून

अंत करतात पापाचा प्रसंगी वागून सक्तीने

पण हे सगळ खोट आहे

खरे या धरतीवरचे देव तर,

नेते, अभिनेते अन धनदांडगे आहेत

त्यांच्या दोन्ही हातात आहे दहा हत्तींच बळ

ते कुठला ही गुन्हा करोत, देशाशी गद्दारी करोत,

झोपलेल्या निरपराध माणसांवर

बेमुर्वत दारूच्या नशेत गाडी नेवून ठार मारोत

वा अगणित बेहिशोबी मालमत्ता बाळगोत

सगळे कायदे पायदळी तुडवून

सुखरूप सही सलामत सुटून बाहेर येणे

हे आहे त्यांच्यासाठी डाव्या हाताचा मळ

 

खरेच ही मंडळी खऱ्या अर्थाने आहे अवतार

स्वतःच्या पैशाच्या, ताकदीच्या अन ओळखीच्या भरवशावर

हे झुकवती कुणास ही स्वतःच्या पुढ्यात

सुटताच जेल मधून

भव्य मिरवणुकीत मिरवत,

वाजत गाजत निघतात रस्त्याने,

जसा राम वनवास भोगून राजप्रासादी निघाला उत्साहाने

 

यांच्या दिव्यशक्तीपुढे भल्याभल्यांच्या सुटे अंगास थरकाप

यांच्या वाटी जाणे म्हणजे ओढवून घेणे आहे

शनीचा कोप अन पराकोटीचा शाप

हेच तर खरे धरतीवरचे देव आहेत

हे जरी नसले तेहतीस कोटी

पण त्यांच्याजवळ ताकद अन पैसा आहे

त्यापेक्षा कितीतरी अमाप