काय हो ! मंदिर, दर्गा, गिरिजाघरात गेल्यावर
खरच मिळते का समाधान देवाला नमस्कार केल्याच,
मला तरी वाटते नाही
कारण जाता तेथे मोठ्या भक्तिभावाने, तर तिथे दिसे
गाभाऱ्यात पूजा, प्रेअर, सजदा करण्यासाठी बसलेली श्रीमंत मंडळी
तिथल्या पंडित, पाद्री, खादीमांची खुशामत करत असलेली
अपुल्या सारखा गरीब, दीन, बापुडा जाता दर्शन करण्या गाभारी
तोच अंगावर वस्कावून ती धर्ममार्तंडांची मांदियाळी
“चल बाहेरून दर्शन घे, आत येऊन अडचण करू नको“
असे दरडावून सांगून बाहेर हाकलून देत दिसे गरिबांवर रुठलेली
धर्ममार्तंडांची प्रत्येकाची भक्ती मोजण्याची फुटपट्टी असे निराळी
श्रीमंत यजमानांना देवाच्या निकट प्रवेश मिळून
तेथील प्रतिमा, मजारीला हात लावण्यास मुभा असे सगळी,
पूजा, प्रेअर, सजदा होताच, एक–दोन लाल–काळे धागे मंतरून
देवाचे खादिम त्यांच्या मनगटाला बांधती करकचून
वा म्हणती बाहेर कंपाऊन्डच्या जाळीला द्या बांधून
हे सांगून कि तुमच सर्व दुःख हरण होईल आजपासून
दिसे धर्मस्थळी पैसेवाल्यांचीच तुती बोलती
व तशा लोकांनाच तिथे मान मिळती
गरीब बिचारा रांगेत लागून आपल्या कर्माचे भोग भोगती
अन श्रीमंतांचे होणारे लाड पाहून हेव्याने
पुढच्या जन्मी मला ही असाच कर म्हणती
वरचा विधाता ही श्रीमंतीलाच भावतो,
देव सोन्याचे, त्यांची धर्मस्थळे सोन्याने मढविलेले,
मजारीवर हिरे गढविलेले तर क्रॉसवर तलम ऊंची वस्त्रे चढविलेले
त्यांना ही सामान्य भक्त्तांशी काही घेण–देण नाही
ते ही श्रीमंतांच्या भरवशावर स्वतःच्या अंगास चंदनाचा लेप लावून
मंत्रोच्चारात पसंत करती स्वतःस पुजणे,
थडग्यातील प्रेषित ही पसंत करती धुपाच्या घमघमाटात,
फुलांच्या वा मखमलीच्या चादरी आच्छादून आपल्या मजारीस सजणे
गरीब धर्मस्थळाबाहेर उभा राहूनच दर्शन घेतो व आपल नशीबच खोट,
आपण फार मोठे पापी आहोत म्हणून देव अशी शिक्षा देतो
त्यामुळेच जो तो आपल्याला बोलतो ही समजूत करून घेतो
व निमूटपणे दर्शन करून, बैलासारखा खाली मान घालून, निघून जातो
त्यातला मी ही एक !
दररोज या पंडित, खादिम, पाद्री लोकांच्या अशा वागण्याचा अनुभव घेतो
जेव्हा जाता दर्शना, दिसे तिथे कोणी श्रीमंत यजमान गाभारी बसलेला
दुरूनच देवाला हात जोडतो, उगाच नको कुणाशी हुज्जत म्हणून
डोळे बंद करून सारे ते सहन करतो