ज्याला आपण सुखकर्ता, दुःखहर्ता देव म्हणतो
त्याने ही पृथ्वीवर मोठा हाहाःकार माजवून सोडला
जाती–धर्माची निर्मिती करून, त्यांच्यात भांडण लावून,
सर्वधर्म समभावाची शिकवण देऊ लागला
मोठा छाकटा आहे रे बुवा तो देव
बर, जाती–धर्म तर निर्माण केलेच, पण त्यात ही,
सवर्ण, ओबीसी, अल्पसंख्यांक, अगडा–पिछडा, कम्युनिस्टांच चंदन लावून गेले
एवढयावरच थांबले नाहीत ते
तर प्रत्येक जाती–धर्मात एक एक समाजसुधारक निर्माण करून
त्यांना देवाचा दर्जा देऊन, त्या समाजसुधारकाविरुद्ध,
कोणत्या दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीने अपशब्द उच्चारला तर
त्यास हिरवे, निळे, लाल होईस्तोर मारण्याची मुभा ही दिली
हे देव मोठे छाकटे,
धरतीवरची सारी प्रजा ही प्रभूची संताने म्हणून सांगितले
अन त्यांच्यावर जाती–धर्माची बंधने लादून
गावाच्या वेशीबाहेर जनावराच्या गोठयागत,
घाणेत राहण्यास उदयुक्त केले
हया देवांनी स्वतः दूध, दही, तूप, पुरणपोळी खाल्ली
अन लोकांना शूद्र जातीतला बनवून उपाशी ठेवण्यास कसर नाही ठेवली
बर यांनी जातिगत व्यवसाय ही नेमून दिले
सवर्णांना स्वतःची स्तुती करण्यासाठी स्तुतिपाठक म्हणून नेमले
तर शूद्रांना स्वतःची घाण साफ करण्यासाठी ठेवले
यांना शूद्रांचा स्पर्श ही नकोसा झाला
तो दुरुन दिसलाच तर, आता आपल्याला विटाळ होईल म्हणून
यांच्या पडे कोरड घशाला
व्वा रे देवा, मोठा धूर्त आहे रे तू,
स्वतःस सगळ्या प्राणिमात्रांचा रखवाला म्हणतोस
अन माणसाला श्रेष्ठ–कनिष्ठ संबोधून त्यांच्यात भांडण लावतोस