नका कोणत्या देवधर्माला नावे ठेवू

 

आपण फक्त प्रत्येक देवधर्माला, त्यातील चालीरीतींना,

संतांना नावे ठेवण्याचेच काम करतो

पण त्यांच्यातील सदगुणांची, चांगुलपणाची तारीफ करणे मात्र टाळतो

 

प्रत्येक धर्मात भाईचारा आहे

दिवाळी, ईद वा ख्रिसमस बघा सण रोषणाईचा

एकमेकांना गळे भेटण्याचा, मिठाई वाटून खुशिया वाटण्याचा

आपल्या साधू, संत, पीरांच्या आयुष्याकडेच बघा

कुत्र्याने कोरडी पोळी न खावी म्हणून, संत नामदेव,

तुपाची वाटी घेऊन त्यामागे धावले

साईबाबा सबका मालिक एकम्हणत राष्ट्रीय एकोप्यासाठी झटले

मदर टेरेसा जगातील अनाथांसाठी आशेचा किरण म्हणून जगले

भगवान बुद्ध शांतीचा संदेश देत जागतिक शांतीचा वटवृक्ष बनले

 

आपणास मात्र नावे ठेवायला संधीच पाहिजे

प्रत्येक धर्मातच वाईट चालीरीती आहेत,

प्रत्येक धर्मग्रंथात काही ना काही वावग लिहिलेल आहे

तर कोणत्या ना कोणत्या संताने देखील त्या काळानुरूप

काहीतरी विपरीत बोललेल आहे

म्हणून का ते संतमहात्मे, तो धर्म वाईट ठरतो

 

आपण सुशिक्षित आहोत,

स्वतःहून आता त्या वाईट गोष्टी बाजूला सारल्या पाहिजे

त्या आजच्या काळात उपयोगी नाही म्हणून कालबाहय केल्या पाहिजे

मित्र हो, नका हो कोणत्या देवधर्माला, त्यांच्या सत्कर्माला नावे ठेवू

दोन दिवसांची आपली जिंदगानी, सगळ्यांसोबत आपुलकीन राहू