गर्वाने लोक मोठे सांगती
मी साईबाबांना अमुक रुपयांची चादर अर्पण केली,
गजानन महाराजांच्या देवळात
इतक्या रुपयांच्या अन्नदानाची पावती फाडली
अरे, तर असे करून तुम्ही काय या देवांवर उपकार केले ?
काय ते तुमच्या दोन पैशांवर अवलंबून आहेत ?
अरे भिकारचोटहो, तुम्हीच तर त्यांच्या दारचे भिकारी आहात,
तुम्हीच तर त्यांना हया असल्या चादरी अर्पण करण्याचे,
अन्नदानाची पावती फाडण्याचे लालूच दाखवून
साऱ्या जगाच्या सुखाची मागणी करता
अरे जरा साईबाबा, गजानन महाराजांचे स्तोत्र, पोथ्या वाचा
बघा त्यांचा भूतकाळ
अरे त्यांना कोणी खावयास देत नव्हते, अंगावर त्यांच्या वस्त्र नव्हते,
जो तो त्यांची हेटाळणी करीत अंगावर मारायला धावून हाकलून दयायचा,
त्यांनी लोकांच्या उष्टया पत्रावळीतील शीत वेचून खाल्ली,
अन ते तुमच्याकडून पैशाची, मानपानाची अपेक्षा ठेवतील
अरे हा तुमचा भ्रम आहे कि देवाला हिरेजवाहिर दिले
तर ते आपले गुलाम होतात
ज्यांनी जीवनात सदैव दुःख भोगले, जे अन्नाच्या एका कणासाठी आसुसले
त्यांना गरिबीची, अन्नाची कदर असते,
व जे आपण भोगले ते इतरांनी भोगू नये म्हणून
“सदैव सर्व समाजाच्या हितासाठी मरुनही झटणे” हे त्यांचे ब्रीद असते
त्यांच्या दरबारात अधम पापी, मोठ्यातला मोठा गुन्हेगार का ना येवो
हे संत त्याच्याकडे करुणेच्याच भावनेने पाहतील,
त्याला चांगुलपणाचा मार्ग दाखवतील
पण तो अधम पापी आहे म्हणून त्याची भर्त्सना नाही करतील
आज मोठे तुम्ही या संतांच्या पुतळ्यांवर भरजरी वस्त्रे चढविता,
पंचपक्वान्नाचे भोग खाऊ घालता, पण ते त्यांना नको आहे,
आज ते मरून कीर्तिरूपे उरून
समाजातल्या सर्व स्तरांच्या लोकांना दोन घास खाऊ घालून
त्यांच्या दुःखांवर फुंकर मारून आशेचा किरण दाखवीत आहेत
मित्रहो, नका हो गर्व करू,
कोणत्या देव, अल्ला, गॉडला अमुक रूपयांच दान दिल म्हणून सांगू
आपल्यातला अहंपणा सोडा, जे या संतमहात्म्यांनी भोगल ते भोगून,
अजून कोणी नवीन संत–महात्मा निर्माण होऊन,
नका हो आता त्याच मंदिर, दर्गा उभारू