नका हो हाल करू

 

कुठे आंबेडकरी चळवळ

तर कुठे विनोबा भावे विचारमंच

कुठे विवेकानंद अभ्यागत् कक्ष

तर कुठे भगतसिंग व्याख्यानमाला

का दूषणे लावता हो हया माहात्म्यांना

उभे आयुष्य देशकार्यासाठी,

समाजोद्धारासाठी वेचले यांनी,

भारतमातेसाठी, त्यांच्या लेकरांसाठी

प्रसंगी प्राण वेचले ज्यांनी

नका हो यांच्या विचारांचे धिंडवडे काढू

अनुद्ग्गार काढून कडवे बोल बोलू

खूप सोसल हो या पुण्यात्म्यांनी

आता तरी शांततेत, तसविरीत राहू दया विसावू

 

पुण्यतिथी, जयंत्यांना मोठमोठे फोटो, बॅनर्स लावायचे

प्रचार करून गर्दी कशी जमेल तेवढ पहायचे

वेडेवाकडे बोलून एकमेकांच्या साहित्याला नावे ठेवायचे

ग्रंथातील संदर्भांचे दाखले देऊन

पहा हेच असे वदले“, सांगून स्वतः नामानिराळे रहायचे

जनतेला जातीधर्माच्या वणव्यात होरपळून

स्वतःला समाजाचा धुरीण म्हणून वदवायचे

शोषित, वंचितांना मदतीचा हात म्हणून मिळालेले अनुदान

त्यांना तळागाळात ठेवून स्वतः लाटायचे

खादीच्या शर्टवर महात्म्यांच्या चित्रांचे बिल्ले लावून

खांदयावर शबनम घेऊन स्वतःला समाजसेवक समजायचे

कुण्या महामंडळावर वर्णी लावून मोठमोठी पदे भूषवायचे

वा राज्य, विधिमंडळात जाऊन मंत्री व्हायचे

 

नका हो हाल करू, थोडी तरी दया येऊ द्या

हे तेजस्वी लख्ख तारे, स्वकर्तृत्त्वावर झळकणारे

कार्य यांचे आकाशापेक्षा ही थोर

थोडा तरी त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या

का करता हो यांच्या नावाचा उध्दार

तिळभर तरी लाज वाटू द्या

फार झाल हो हे आता, उपेक्षू नका त्यांना

निदान मरणोत्तर तरी सुखाने राहू द्या

यांच्या विचारांनी प्रेरित होऊन

वंचितांना आपल्या न्याय्य हक्कासाठी संगठीत होऊ द्या