नमन करतो सेवाभावी संस्थांना

 

नमन करतो धर्मार्थ दवाखाने, वृद्धाश्रमे, निःस्वार्थ भावनेने

फुकटात अन्नदान करणाऱ्याया संस्थारुपी देवळांना

ज्यात मिळे असहाय, अगतिक म्हाताऱ्या, परित्यक्त्यांना

मोफत इलाज, निवारा अन सुखाचे दोन घास,

ज्यांना घरातून, मनातून आपल्या स्वकीयांनी हाकलले

ते दुरावलेले जिथे अनुभवती दोन क्षण सुखाचे खास,

ते उभारणाऱ्या मानवरूपी देवतांना

 

काही लोक अप्रत्यक्षपणे समाजाची निःस्वार्थपणे सेवा करतात

पण नामानिराळे राहतात,

कोणी पक्षांना दाणे खाऊ घालतो, तर कोणी

रानमाळावर वृक्षारोपण करून उजाड प्रदेश सुजलाम सुफलाम करतो,

तर कोणी, शाळेत जाणाऱ्या मुलांची कुचंबणा होऊ नये म्हणून

स्वतःच्या पैशाने नदी, नाल्यांवर पूल, रस्ते बांधतो

नमन माझे या शांतिदूतांना, प्रसिद्धी पासून दूर राहणाऱ्या या संत महात्म्यांना

 

भलेही या देवालयातून घंट्यांचा, अजानीचा ध्वनी ऐकू येत नसेल,

त्याकडे लोकांची नजर जात नसेल,

हि मानवतेची देवालये, दर्गे उभारणाऱ्या संत, महात्मे, पीरांना

कोणी ओळखत नसेल

परंतु तुम्ही कल्पनाही करू शकत नाही

यात राहणाऱ्या, आपल्याच मुलाबाळांनी रस्त्यावर सोडून दिलेल्या

आपल्या जन्मदात्या, रक्ताच्या नात्यारुपी भक्तांच्या हृदयातून निघणाऱ्या

किती दुवा यांना मिळत असेल

 

नमन करतो धर्मार्थ दवाखाने, वृद्धाश्रमे, निःस्वार्थ भावनेने

फुकटात अन्नदान करणाऱ्याया संस्थारुपी देवळांना

व ते उभारणाऱ्या मानवरूपी देवतांना