नव्या दमान जगतो

 

आता नाही जात हो मंदिर, मस्जिदी

ना फोडत देवापुढे नारळ

ना चढवत कोणत्या मजारीवर चादरी

आता नाही खर्च करत पैसे त्यांच्यावर

अहो, हे कशाचे देव, येत नाही त्यांना दया

करत नाही ते कृपा माझ्यावर

 

मोठ्या भक्तिभावाने मी जात होतो तेथे

होईल आपली मनोकामना पूर्ण असे वाटे

दिवस गेले, वर्ष गेले, आता वय ही समाप्तीकडे झुकले

पण कधीच आयुष्यात समाधानाचे क्षण ना अनुभवले

काळजीन, जवाबदारीन चेहेऱ्यावर सुरकत्या पडून कंबरड मोडले

आता तर मान वर करून

कोणत्या धर्मस्थळाकडे पाहण्याचे अंगात त्राण ही ना उरले

 

मोठ्या उत्साहाने दररोज हारफूले वाहत होतो देव, पीर, गॉडला

स्वतः काही खात नव्हतो, पण उपाशी राहून

नाश्त्याचे पैसे टाकत होतो देवापुढच्या दानपेटीला

दररोज चकरा मारता मारता मंदिर, मस्जिद, गिरिजाघराच्या चपला झिजल्या

आयुष्यात होत नसलेला बदल पाहून उरल्या सुरल्या आशा ही विझल्या

 

भाऊ ! आता नाही जात रे कोणत्याही देव, पिरासमोर

कितीही त्याच्या दाढीला हात लावा, पण तो घेतच नाही माझी खबर

संकट आल की निरागस डोळ्याने आता फक्त बघतो आकाशाकडे

काय म्हणायच ते मनातच म्हणतो अन आलेले भोग भोगण्यासाठी

अंगात शक्ती आणून, खाली मान घालून, नव्या दमान जगतो