गेलो दर्शनासाठी एका देवळात तर तिथे एक पाटी लावली होती
“हि जागा मंदिराची असून काही लोक बनावट कागदपत्रे तयार करून
ती परस्पर विकण्याचा प्रयत्न करीत आहेत“
वाचून नवलच वाटले
त्या देवळातल्या भगवंताकडे कारुण्य भावनेने पाहिले अन विचार केला
आपण घरातून बाहेर निघतांना देवालाच नमस्कार करून निघतो,
घरातून निघतांना जर गाय दृष्टीस पडली तर
“आजचा शुभ दिवस आहे” म्हणून मानतो
वह्या–पुस्तकांवर काही लिहिण्याच्या आधी “श्री” लिहितो
अन त्याच भगवंताची, देवळाची, मस्जिदीची, चर्चची जमीन
बिनबोभाटपणे बनावट कागदपत्रे सादर करून शंभर जणांना विकतो
किती हलकट आहोत आपण, आधी तर माणसांना फसवीत होतो,
नंतर माय–बापाला आणि आता देवाला गंडविणे सुरु केले आहे
खरच आता आपल्याला देवाची ही भीती राहिली नाही
तो केवळ नामस्मरणापुरताच मर्यादित राहिला आहे