नावे देवांची करणी कसाबाची

 

राम, अकबर, अब्राहम नावेच आमची फक्त देवांची

करणी मात्र कसाबाची

ज्या दिवशी पैदा झालो, तो दिवस असेल ज्या देवाचा

त्या देवाच्या नावाचे स्वतःस नामकरण करून घेतो

अन मोठे झाल्यावर कृष्णलीला करून,

कृष्णाष्टमीलाच पैदा झाला, श्रीकृष्णाचे गुण त्याच्यात येतीलच“,

असे म्हणून भगवंतालाच बदनाम करतो

 

राम, अकबर वा अब्राहम साऱ्या जगाचे दैवत,

जगातल्या सर्व माणसांवर त्यांची सारखी प्रीती

अन आम्ही मानव, धारण करून त्यांची नावे

एकमेकांचे गळे कापण्यास धावतो

राम नाव धारण केलेला ईसम बारमध्ये बसून प्रभू रामाला कलंकित करतो

तर अब्दुल्ला भर चौकात जनावराचे मांस कापतांना दिसतो

तर अब्राहम आपल्याच लहान भावाला येशूला संपत्तीतून बेदखल करतो

 

ऐकल आहे की राम, रहीम, येशू अवतारी पुरुष आहेत

अवतार घेऊन दुरात्म्याचा नाश करतात

परंतु आम्ही मानव धरतीवर अवतरून

ह्या महान देवांची नावे धारण करून

त्यांनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचा मनात येईल तसा अर्थ लावून

धरतीवरची शांतता भंग करतो

 

नावेच आमची फक्त देवीदेवतांच्या नावावर ठेवलेली

करणी मात्र राक्षसास शोभेल अशी केलेली