निसर्गाकडे पाहून आपण काहीतरी शिकलो पाहिजे
ते पहा बरे कसे मिळून मिसळून राहतात
कोणताही पक्षी कोणत्याही वृक्षावर बसतो
पण त्या वृक्षाला हा पक्षी श्रेष्ठ वा तो अस्पृश्य
वा त्या पक्षाला ते झाड शुभ किंवा अशुभ याचा मनातही विचार नसतो
पृथ्वीवर साऱ्या धर्मा–जातीचे लोक राहतात
पण पृथ्वीला त्याचा बाट नाही
एकाच मातीपासून विविध धर्माच्या लोकांची घरे,
विविध धर्माच्या देवीदेवतांच्या मुर्त्या–पुतळे,
मंदिर–मस्जिद, चर्च अन गुरुद्वारे बनतात
अन अत्यंत सगळे गुण्यागोविंदाने नांदतात
मग आपण कसा या सगळ्यात भेद पाळतो
चिमणीला बामन अन कावळ्याला मांग म्हणतो
देवाला चंदनाच्या देव्हाऱ्यात ठेवतो अन अंत्यजनाला
आडजातीच्या झाडाच्या फळ्यांच्या घरात कुडकुडत ठेवतो
सगळी प्रभूची संताने म्हणतो
अन कुणाला राम, कुणाला रहीम अन कुणाला अब्राहम संबोधतो
आपल्याला निसर्गापासून सगळ काही हव आहे
पण त्याच्यापासून काही चांगल शिकायच नाही आहे
पण मित्र हो हे नका विसरू,
जरा कुठेही काही कमी–जास्त झाल की निसर्ग कोपतो अन सुनामी बरसतो
तसाच अति धर्मातिरेक झाला की विधात्याची शिकवण बाजूला सारून
मनुष्य रसातळाला जाऊन माणुसकीचा अंत होतो