नेक कर्म

 

फिराव बाहेर तर दिसते विचित्रच परिस्थिती

रस्त्याच्या कडेला, फूटपाथवर निराश्रित आबालवृद्ध

विट डोक्याखाली घेऊन जमिनीवर झोपलेले दिसती

मंदिरमस्जिदीबाहेर हातपाय जोडून अर्धनग्न उपाशी पोट

भरण्या पोटाची खळगी भीक मागत असती

पण भक्त्तगण/जायरीन पाहून त्यांच्याकडे, मुरडून नाक,

लपवून आपल्या मूल्यवान वस्तू, “दूर हो म्हणूनत्यांच्यावर खेकसती

धर्मस्थळी गहू, तांदुळाचे पोती उबडे होऊन पडती

कडक कपड्यातली, सोन्याने नटलेली श्रीमंतांची अवलादे

बफे सारखा घेऊन प्रसाद प्लेटमध्ये खादाडत सुटती

अन मंदिर, मस्जिद, गिरिजाघराच्या सौंदर्यीकरणासाठी

लाखोंची माया मुक्त्तहस्ते उधळती,

भाविकांच्या राहण्याकरीता भव्य भक्तसंकुले बांधती,

श्रीमंतांचे ब्लड, शुगर, थॉयराईड मोजण्या

धर्मार्थ दवाखान्याची मुहूर्तमेढ रोवती

 

देवालयीचे देव, पीर, मसीहे मुकाटपणे

आपल्या सुवर्णसिंहासनावरून, अंगावर मखमली शाल लपेटून,

कबरीत आराम करून दुरून तमाशा पाहती,

पाद्रीच्या मुखे प्रेअर करून, त्यांच्या हस्ते

पूजास्थळाबाहेर कृपावर्षावासाठी आसुसलेल्या

रंजल्या गांजल्यांवर गोमुत्राचा शिडकाव करून

प्रभूला शरण जा, तोच तुमचा तारणहार आहे,

नाहीतर होईल दुर्गतीम्हणून सांगती

 

मित्र हो, देव जर सर्वांच भल करणारा आहे

तर तो अस अहित कुणाच कस साधेल

आपल्याच सारख्या हाडामासाच्या,

दीनदुबळ्या लोकांकडे वक्रदृष्टीने कसा बघेल

 

आपण गर्वाने वागतो आहे, इतरांना हीन समजतो आहे

दोन चांगले कपडे घालून इच्छापूर्तीच्या मागे लागून,

थोड्याशा अपयशाने खचून

मंदिर, मस्जिद, गिरिजाघराची वाट चोखाळतो आहे

आपण भक्तांसाठी भक्त निवारे, इबादतखाने, चॅपल्स तर बांधतो

पण रस्त्याआड झोपलेल्या निराश्रितांकडे पाहून, नाक मुरडतो

मंदिर, मस्जिद, गिरिजाघराला भरघोस अन्नदान करतो,

त्यांच्या सौंदर्यीकरणासाठी धजतो,

पण धार्मिकस्थळी बाहेर उभ्या असलेल्या खऱ्या भुकेल्यांना

जेवत असलेल्या लोकांची तोंडे पाहत तसेच उपाशी ठेवतो,

घाणित लोळवतो, औषधाच्या एका थेंबालाही वंचित करतो

 

चुकल तर देव वाईट करल म्हणून आपण भितो

अन चांगल होण्यासाठी भरघोस दानदक्षिणा देतो

अहो देव हा माणसाच्या हृदयात आहे, कोणत्या धर्मस्थळी नाही

कुणाची व्यथा समजा देऊन मदतीचा हात, नका पाहू जातधर्म

गरिबाचीच दुवा आशीर्वाद बनून समोर येते, जेव्हा करता तुम्ही नेक कर्म