बलशाली, तंत्रशाली भारतात
लागावी नौकरी, धंदयात व्हावी बरकत,
मिळावे परीक्षेत यश भरघोस म्हणून
दिसती युवक मंदिरात करतांना आरती,
दर्ग्यात चढवितांना चादर,
चर्च जवळ दिसता कुणी पाद्री,
आदराने त्यास म्हणती “गुड मॉर्निंग” फादर
मनगटात काळे, पिवळे, लाल धागे
हिरव्या चौकोनी डबीत गळ्यात बांधलेले दोरे
देवीच्या जागरणात रात्रभर जागती
अन पिराच्या उर्स मध्ये ताबूत घेऊन निघती
“आलोच आहे तीर्थक्षेत्री” म्हणून गाडीची पूजा ही करून घेती
चार–पाच रंगीत धागे त्याला ही बांधून देती
एवढ करून होती भल्ले खुश, म्हणती देवाने दिला आशीर्वाद
मारून मंदिराभोवती प्रदक्षिणा, समजती जणू भेटला देवच
आता नाही कशाच भय, प्राप्त केल जीवनरक्षक कवच
सोमवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार देवाचे ठरलेले दिवस
अपॉइंटमेंट असते याच दिवशी देवांची भक्तांना रात्रंदिवस
अन याच दिवशी अवतरून धरतीवर लोकांना असतात ते पावत
करून गर्दी, फाडून वेगवेगळ्या दर्शनाच्या पावत्या
भक्त्तगण बोलून दाखविती आपल्या मनोकामनेचा मानस
देऊन चिरीमिरी तिथल्या खादिम, पुजाऱ्याला
फळाप्रसादाचा पेटारा वाहून फेडती आपला नवस
खरच अस केल्यान देव प्रसन्न होत असतो का ?
प्रसादाची, दक्षिणेची लाच देऊन तो दिसत असतो का ?
अहो युवकांना पहा तर, तो मोबाईलच्या आहारी गेलेला,
पानठेल्यावर पिंक मारत उभा असलेला,
परीक्षा येताच थातुर–मातुर वाचून, आपण सहज बाजी मारू
म्हणून गर्वाने फुगलेला
अयशस्वी होताच नशिबाला दोष देऊ लागतो,
नशीबच खोट म्हणून रडू लागतो
यशस्वी व्यापाऱ्यांकडे पाहून
“यांच्या बापजादयांनी कमावून ठेवल म्हणून यांचे धंदे आहेत,
आमच्याही बापजादयान कमावल असत तर आम्ही काही वेगळे असतो“
टोळक्यात सिगारेट पिता पिता बरळत असतो
मित्र हो, मंदिर–मस्जिदीत जाऊन, देवाला हारतुरे, चादरी वाहून देव प्रसन्न होत नसतो,
असावी लागते जिद्द काहीतरी करण्याची
तेव्हाच ईच्छा होते नशिबाची तुम्हाला काही तरी देण्याची
करा हो, प्रयत्नांची पराकाष्ठा ध्येय साध्य होईस्तोर
उगीचच नाही म्हणत प्रयत्नांती परमेश्वर