जाता रस्त्याने तलावाकाठी वा मंदिराभोवती
दिसती भग्न, कुजल्या, अपंग देवीदेवतांच्या मूर्ती
फटाके फोडून छन्नविछिन्न झालेल्या त्यांच्या चित्ररूपी देहाच्या अस्थी
किती निर्ढावलो आम्ही, आम्हाला नाही देवाच पावित्र्य
पैशाच्या नशेत झिंगून चढलीया मस्ती
त्याच देवीदेवतांना भिऊन, त्यांच्या नावाच व्रत करून
राहून निर्जला वा एकभुक्त,
करून नऊ दिवस वा एक महिना उपवास
तेवढ्या दिवसापुरतेच पुजतो त्या महानुभवास
होता व्रत समाप्ती वा त्या पवित्र महिन्याची गच्छंती
गुंडाळून एका कोपऱ्यात पूजेची सामुग्री
आपल्या इष्टदेवतेस “गुडबाय” म्हणती
उत्सवाला देवाच्या महागड्या मुर्त्या आणतो,
ब्राम्हणांच्या साक्षीने प्रचंड खर्च करून पूजा–अर्चा करतो
महाप्रसाद म्हणून हजारो लोकांच्या पंगता उठवितो
अन उत्सव संपताच त्यांना अडगळीच्या ठिकाणी ठेवून,
मुलांच्या हाती खेळण्यासाठी देऊन त्यांचे हाल करतो
देवाला ही शोभेची बाहुली केलय आपण,
त्याला घोड्यावर काय बसवतो, हॅट काय घालतो,
गॉगल काय लावतो, पॅन्ट–शर्ट घालतो,
पितांबर सोडून मिलिटरी, इंस्पेक्टरचा वेष चढवितो
शो–रूम बाहेर उभ्या ठेवलेल्या पुतळ्यागत त्यास सजवितो
कधी गोल, चौकोनी वा षट्कोनी आकारात घडवितो
“आमचा देव पहा कसा लवचिक” हे लोकांस दर्शवून
त्याचे हसे करून खिजवितो
संकटातच फक्त आपण त्याला आळवितो
अन जे पाहिजे ते त्याच्याकडून मिळवितो
होता कार्यसिद्धी, त्यास धुळीत लोळवितो