टी. व्ही. वर कोणत्याही धर्माची प्रवचने ऐकतांना
लक्षपूर्वक एक गोष्ट अनुभवा
प्रवचन सांगणाऱ्या बाबांचे, खादीमांचे किंवा पाद्र्यांचे चेले
ब्रेक मध्ये आपल्या धर्मसंस्थांची जाहिरात दाखवून
वारंवार एकच गोष्ट सांगत असतात
“जर तुम्हाला काही प्रापंचिक अडचणी, काही समस्या असतील
तर त्या तुम्ही आम्हाला आमच्या रजिस्टर्ड ई–मेल वर पाठवा
किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करून
त्या समस्यांच निराकरण आमच्याकडून करून घ्या“
भोळी भक्त्त मंडळी आपल्या ढीगभर समस्या घेऊन
त्या तथाकथित भोंदू धर्मगुरूंना खंडीभर ई–मेल धाडून,
शेकडो फोन करून, त्या धर्मगुरूंची भरमसाठ ऑनलाईन फी भरून
आपल्या समस्यांचा मारा त्या वेबसाईटवर करतात
भक्त्त हे त्यांच्या समस्यांना इतके घाबरलेले असतात
कि त्यांच्यात समस्यांचा सामना करण्याचे धैर्यच उरले नसते
त्यांना सार जग अंधःकारमय दिसू लागते
त्यांच्या समस्या असतात, “मी इतका शिकलो, सवरलो, खूप इंटरव्यूव्ह दिले
पण मला अजूनपर्यंत सरकारी नौकरी मिळाली नाही,
कृपया मला सरकारी नौकरी मिळू दे“
कोणी लिहितो, “माझ्या मुलीला तिच्या नवऱ्याने सोडून दिले,
आता तीच कस होईल?
तर कोणी म्हणतो, “माझ्यावर खूप कर्ज झाल, फेडता ते फिटत नाही
मी काय करू?
तर कोणी कण्हतो, “मी सदैव आजारी असतो,
पण मला कोणत्याच औषधाने गुण येत नाही त्यावर उपाय सांगा
व माझी व्याधी पळवा” वगैरे वगैरे …
मित्र हो, खरच हया तथाकथित बाबांजवळ हया समस्यांवर उपाय असते
व हे बाबा, खादिम, पाद्री जर हया समस्या सोडवू शकत असते
तर जगात कोणीच दुःखी नसत
समस्या आली की सामान्य माणूस हया तथाकथित भोंदू धर्मगुरुंजवळ जाऊन,
त्यांना फी देऊन, डोनेशन देऊन,
पटकन आपली समस्या दूर करून, सुखी झाला असता
पण हे सर्व धर्मीय भोंदू प्रवचनकार पैसे लुबाडण्यासाठी
खोटे बोलून, लोकांच्या असहाय मानसिकतेचा गैरफायदा घेऊन
आपलीच झोळी भरत असतात
मित्र हो, जर तुम्ही हया भोंदू सर्वधर्मीय प्रवचनकारांना/धर्मगुरूंना
पैसे देऊन समस्यांचा निपटारा करा म्हणता
तर हया भोंदू सर्वधर्मीय प्रवचनकारांनी/धर्मगुरूंनी
क्षणात हया समस्या सोडविल्या पाहिजे
कारण त्यांच्यासाठी हया समस्याच नाही
त्यांच्यासाठी हया समस्या म्हणजे “किस झाड की मुली“
जर कुणाला नौकरी लागत नसेल तर त्यांनी पटकन
अधिकाऱ्याला, मंत्र्याला फोन लावून स्वतःच्या ओळखीने
त्या युवकाला कुठल्या तरी चांगल्या सरकारी ऑफिसमध्ये
नौकरी लावून दिली पाहिजे,
कोणा मुलीला तिच्या नवऱ्याने सोडले असेल
तर हया धर्मगुरूंनी तिच्या नवऱ्याला समजावून,
त्यांच्यात समेट घडवून आणला पाहिजे,
कुणावर कर्जाचा डोंगर असेल तर हया धर्मगुरूंनी
स्वतःला मिळालेल्या डोनेशन मधून त्या भक्ताचे कर्ज फेडले पाहिजे
अन कोणी जर आजारी असेल तर स्वतःच्या संस्थेच्या माध्यमातून
त्या व्यक्तीचा चांगल्या दवाखान्यात ईलाज करून
त्याला व्याधीमुक्त केले पाहिजे
हया प्रवचनकारांनी मनात आणल तर ते क्षणात तस करू शकतात
पण ते असे करत नाही, त्यांना कुणाशीही घेण–देण नसते
भक्तांना त्यांच्या समस्येची भीती दाखवून
यांना केवळ तुमच्या सारख्या देवभक्तीत आंधळ्या झालेल्या लोकांची
त्यांच्या आश्रमाभोवती गर्दी हवी असते
व तुमच्या पैशांवर पंचतारांकित सुविधेत लोळायच असते
मित्र हो, डोळस बना, सोडा तंत्र–मंत्र अन भूतबाधा
स्वतःच्या समस्यांवर अंगात धैर्य आणून स्वतःच उपाय शोधा