मंदिराचे भट, पुजारी

 

पाहिले मंदिरात, तेथील भट, पुजारी

देवापुढे ठेवलेला अत्युत्तम प्रसाद

किंचित वाटून भक्तांना, काढून वेगळा स्वतःसाठी

लपवून ठेवतांना देवा पाठी

 

आरतीचे वेळी केवळ गोलगोल फिरे पुजाऱ्याच्या हातातील फुलवाती

नजरेत मात्र नैवेद्यातील पंचपक्वान्न अन बासुंदीची वाटी

आटोपताच पूजा, फिरवून अन्नावर पाणी, काढून ठेवी आधाशासारखी

ताटातून वेगळी पुरणपोळी अन कढी, थोडी, लावण्या ओठी

 

लोक ही छटाकभर पेढा अन नारळ प्रसाद म्हणून घेती

त्यातला एक कसाबसा मारून देवाच्या माथी,

चेहरा पाहून ठेविती मोजक्याच लोकांच्या हाती,

वारंवार पुडक्यात पाहून, पुरला पाहिजे म्हणून,

नारळाच्या करवंटी सवे घेऊन जाती घरच्यासाठी

 

वस्त्रालंकार, गहुपोती, जे ही मंदिरी दान येती

सत्कारणी लागले म्हणून लोक भुलती

उत्तमोत्तम त्यातले स्वतःच लाटूनी मठाधिपती

उरलेले उच्च किमतीत देवाचे वस्त्रम्हणून

भोळ्याभाबड्या भाविकास विकती

 

जागोजागी दानपेट्या, धान्यकोठ्या मोठमोठया दिसती

दक्षिणेच्या पावत्या जीर्णोद्धार अन अन्नदानाच्यानावे मिळती

परी दृष्य दिसे वेगळेच, चमचाभर शिरा वा चतकोर रोटी

खातांना दिसती भक्त्त घेऊनि हाती नाली काठी

 

इतके दान येऊन ही मंदिरास

सढळ हाताने मदत कराम्हणून म्हणती

चप्पल स्टॅन्डवर ही खेटर देण्यास पैसे मागती

सेवेच्या नावाखाली पूजाविधीसाठी पैसे ऐठती

 

कशाला आपण त्यांना दोष द्यायचा

आपणच तर मूर्ख आहोत,

क्षणिक संकटांना घाबरून,

ब्रम्हराक्षस पाठी लागला जणू तो खाईल

म्हणून पागलागत संकटनिवारण्यासाठी 

मंदिर, मस्जिदीच्या पायऱ्या चढताहोत