माझी माय

 

खरी समाजोद्धारक तर माझी आईच आहे

शाळा, महाविद्यालयात शिकविला जाणारा ती ग्रंथ आहे

जिने मला सावित्रीबाई फुले बनून, शिक्षणाचा श्री गणेशा करून,

उच्चशिक्षित बनविले

अज्ञान, अंधःकार, भूक, गरिबी, लाचारी यांच्याशी

राजमाता जिजाऊंप्रमाणे दोन हात करून लढणे शिकविले,

मदर तेरेसा प्रमाणे केवळ आपल्या समाजातील लोकांचीच नव्हे तर

आपल्या मायबापाची म्हातारपणात सेवासुशृषा करून

पदरी पुण्य कमविण्याचे बहुमोल मार्गदर्शन केले,

नवऱ्याचे बोलणे खाऊन, जे घरात असेल त्यात सुख मानून,

आपल्या कुटुंबियांना सुग्रास घास खाऊ घालून

कुलदेवता बनून, ऐश्वर्याने, नंदादीपासम घर प्रज्वलित करून ठेवले

तीच तर खरी जनाबाई, शबरीच्या रूपात असलेली संत आहे

 

माझीच आई नाही तर जगातल्या सर्व आई पूजनीय आहेत

जीवनातील दुःख बाजूला सारून आपल्या संसाराचा गाडा यशस्वीपणे पुढे रेटून

निर्मल जलाप्रमाणे चेहेऱ्यावर खळाखळा हास्य आणून आपले घर पुढे नेत आहेत

 

जगदंबा, महालक्ष्मी, भवानी यापेक्षाही माझी माय श्रेष्ठ आहे

या मूर्तिरुपांना पंचामृताने न्हाऊ घालून लोक यांची स्तुतीसुमने गाहे

परंतु इतके कष्ट उपसून ही माझी माय

आपुलकीच्या दोन शब्दांपासून उपेक्षितच राहे