माझ्यातच आहे

 

कशास जावू मी

काशी, मथुरा, पंढरी

अन कशास धुंडाळू

देवालये अन मस्जिदी

माझ्यातच तर वसला आहे

राम, रहीम अन मारुती

मीच आहे माझा सारथी

 

माझ्यातच आहे श्रीकृष्णाची प्रिती,

मारुतीचे बळ अन कर्णाचे औदार्य

अन माझ्यातच आहे

रजो तमोगुण घालवण्याचे सामर्थ्य

 

कशास बोलू नवस मोठमोठाले

अन कशास उठवू पंगता

स्वामी आहे मी माझ्या मनाचा

मीच आहे सर्व जाणता

 

कशास टेकवू माथा कुणापुढे

वा कशास वाहू अगरबत्ती, फुले

स्वामी मी त्रैलोक्याचा

मजसाठी सर्व आसमंत खुले

 

कशास मारू डुबकी गंगेत

का टेकवू माथा हिमलिंगेस

का करू परदेशवारी

पाहण्या त्या अल्लास

माझ्यातच ठायीठायी आहे भगवंत

मीच आहे अनादी अनंत

 

कशास वाचू पोथ्या अन नेसू सोवळे

का आरवू पोटात उपासाचे कावळे

कशास गाऊ आरत्या अन भजने

अन नको ते पंचामृतान देव धुणे

माझ्यातच आहे देव

तर मजसाठी काय उणे

 

देवधर्म आहे सद् वर्तनासाठी

सदाचारासाठी अन बंधुभावासाठी

नाही ते अंधश्रद्धेसाठी,

वा अवास्तव खर्च करण्यासाठी,

आहेत ते सन्मार्गासाठी

आत्मशुद्धीसाठी अन आत्मसन्मानासाठी

 

माझ्यातच तर आहे

बुद्धी, शक्ती अन विचारांचे त्रिदेव

अन त्यांचे आहे सामर्थ्य फार

करीन पुजा तयांची

वाहीन गंध, अक्षता, फुले ज्ञानाची

उधळील स्तुतीसुमने मेहनतीची

धावून जाईन गरजेस दीनहिनांच्या

दाखवून देईल माझ्यातील भगवंता