माझ्या देशात
दवाखाने, वाचनालये, शाळा भलेही नसोत
पण
देवालये, मशिदी, चर्चेस असतील दिसत
माझ्या देशात
जरी दारिद्रयाचे चित्र असेल दिसत
पण
मंदिरा बाहेर दिसतील लोकांच्या रांगा जेवत
माझ्या देशात
नसतील लोक तंत्रज्ञान शिकत
पण
दिसतील कर्मकांड अन माळा जपत
माझ्या देशात
संशोधक, उद्योजक, सुधारक यांना नसेल किंमत
पण
साधूसंन्याशीणींच्या माग डॉक्टर, इंजिनिअर दिसतील फिरत
माझ्या देशात
भलेही लोक एकमेकांना नसतील करत मदत
पण
खांदयावर देवीदेवतांच्या पालख्या घेऊन दिसतील मिरवत
माझ्या देशात
सरकार भलेही पशुबळी बंदीचा कायदा असेल करत
पण
मरीमायच्या नावान लोक दिसतील कोंबडे–बकरे कापत
माझ्या देशात
लोक भलेही नियम नसतील पाळत
पण
देवीदेवतांचा होईल कोप म्हणून असतात घाबरत
माझ्या देशात
इंचभर जमीन नसेल मिळत विकत
पण
मंदिर–मशिदीसाठी शेकडो एकर जमीन लोक देतात फुकट
माझ्या देशात
जरी संतांची शिकवण लोक असतील अंगी बाणवत
पण
फसवणूक करतांना घेतात देवाची खोटी शपथ