मानवाची भूतदया अन प्राणिमात्रा मोठी निराळी
दिवस निघताच यातला देव जागा होई
अन देवाचे नाव घेऊन सत्कर्म करण्यास बाहेर जाई
वारुळावर न चुकता टाके साखर चिमूटभर
का की ते असे मुंग्यांचे घर,
नागपंचमीला पाजी सापांना दूध
का की ते गळ्यात घाली समजून आभूषण भगवान महेश्वर
गायींना खाऊ घाली पोळी घेऊन तिच्या पायांचे दर्शन
का की प्रभू श्रीकृष्ण राखी त्यांच गुराखीपण
कावळ्यांनाही खाऊ घाली पिंड
का की त्यात वसतात पितरजन म्हणून
मासोळीसाठी पाण्यात टाकी दाणे
समजून की त्यांना पांडुरंगाने केले आपल्या कर्णात धारण
अन पुरणपोळी खाऊ घालून, पोळ्याला करे बैलांचे पूजन
जसजसा दिवस कलटे यातली भूतदया, प्राणिमात्रा कमीकमी होई
अन दिवस सरताच संध्याकाळी दारूसंग चिकन, मटण खाई
फ्राय फिश मागवून त्यावर ओते दही
घरच्या पाळीव कुत्र्यासाठी नॉनव्हेज डॉग फूड घेई
फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घुबडाला मान देई
अन इतर दिवशी ते दिसताच त्याला पाहून भिई
फक्त पोथीपुराणात लिहील आहे म्हणून भिऊन पथ्यपाणी पाळी
ते सरताच टी. व्ही. वर बारबालांचा डांस पाहत यथेच्छ पशुपक्षांना गिळी
रस्त्याने जाता दिसता अपघातात जखमी मनुष्य अथवा प्राणी
त्याकडे पाहून, मदत न करताच, तेथून निघून जाई
फक्त सणावारांनाच त्यांची महती कळून आठवण येई,
अन देवाच वाहन, देवाचा अवतार वा देवाचा प्रिय पशु समजून
हारतुरे वाहून, पूजा करून भक्तिभावान आपल्या डोईवर घेई