आपल्या मानवाच ही वागण मोठ विचित्र आहे
स्वतः राहतो मोठ्या महालात, फिरतो वातानुकूलित गाड्यात
घरात ऊन, धूळ, कीटक येऊ नये म्हणून
दारा–खिडक्यांवर जाळ्या ही लावतो
अन रूम फ्रेशनर मारून सुगंधित ही ठेवतो
दिशेच सोवळ पाळून दक्षिणेला बजरंगबलीचा दशभुजेचा मोठा फोटो टांगतो,
इष्टदेवतेला अंगणात, एका कोपऱ्यात देव्हाऱ्यात सोकारी म्हणून बसून ठेवतो
व्वा रे आपला देव अन आपली ही भक्ती, नाही त्याविषयी काही पावित्र्य मनात
तो सुखकर्ता, विघ्नहर्ता आहे ठेवता त्याच्या मुर्त्या, फोटो अशुभ स्थानात
टळून गंडांतर होईल सगळ चांगल हेच असते ध्यानात
सगळीकडेच ही अवस्था आहे, बाहेर कुठे ही पहा
उंच गगनचुंबी देवीदेवतांचे पुतळे, ऊन–पावसाचे तडाखे सोसत
असतात निरभ्र आकाशाखाली उघडे आपले अखेरचे दिवस कंठत
ना त्यावर छत, ना त्याची पूजा, ना त्याविषयी कोणाला सोवळे,
बसतात त्यावर पाखरे, माखून धूळ, निघून पोपडे, उडून रंग,
दिसे त्या मनोहारी तेजस्व्याचे काळवंडलेले रुपडे
ते देवीदेवता ही बिचारे एका पायावर बसून,
तर कधी दोन्ही पायांवर सदैव उभे राहून
आपल्या हातातील गदा, तलवार, शंख, वीणा वा पुष्प घट्ट्पणे पकडून,
सांभाळती आपला तोल जीव मुठीत धरून
त्यांच्या भव्य पुतळ्याखाली मनवली जाई शिवरात्री,
सूर्य रथात बसताच होई रथसप्तमी, तर कुठे कुणाची अष्टमी, नवमी,
एकादशीला निघे भक्तांचा महापूर, तर दूर कुठून ऐकू येई कुंभमेळ्याचा सूर
माजवून भक्तीचा बाजार उत्सवाच्या प्रयोजनार्थ मागती मोठमोठाल्या देणग्या
कथा वाचकांच्या कथा करून, भक्तांना भक्तिरसात मंत्रमुग्ध करून,
कधी गाईच्या नावे, तर कधी गोशाळेच्या नावे उकळती पैसे
करण्या जतन त्यांचे, सांगून संकटात आहे त्या कैसे
देव हे अंतर्यामी, कळे त्यांना दांभिकपणा आपल्या भक्तांचा,
सुखलोलुपतेला सुखावलेला मानव, “न सोसवे तयाला कष्ट अपुल्यासारखे“
हे हेरून मनी, करून त्याच्या सर्व दुष्कृत्यांकडे कानाडोळा,
अज्ञान बालक समजून तो लावी अशाही लंपट भक्तांशी लळा