मी मंदिर–मस्जिदीतून नमस्कार, सजदा करून येत असतांना
अचानक मला मित्र भेटला व तो आश्चर्याने माझ्याकडे पाहत मला म्हणाला
“तू दर्ग्यात गेला होता“
मी त्याच्याकडे चमत्कारिकपणे पाहिले व म्हंटले
“हो, मग त्यात वावगे काय झाले” ?
त्यावर तो मला म्हणाला “अरे पण तू तर हिंदू आहेस“
ते ऐकताच मला त्याचा राग आला व रागाने मी त्याला ताडकन म्हंटले
“तर काय झाले, देव काय कुणा धर्माची, कुणा समाजाची जागीर आहे,
देव सगळ्या जगाचा आहे, त्याला कुणीही भजू शकतो,
तो जगातल्या सर्व लोकांना आपल मानतो,
तुझ्यासारखा तो कुणाला जाती–धर्मात बांधून ठेवत नाही“
परत मी त्याला म्हणालो
“अरे मी दर्ग्यातच गेलो होतो कुठल्या बार मध्ये तर नाही ना ?
अन तिथला प्रसाद भक्षण केला कुठल मदिरा–मांस तर खाल्ल नाही ना ?
कुठल्या बीअर बारमध्ये जाऊन झिंगण्यापेक्षा
मंदिर–मस्जिदीत जाऊन भगवंताच्या नामात दंग होणे केव्हाही चांगले,
दारू पिऊन नालीत पडल्यापेक्षा अध्यात्माचे दोन शब्द कानावर पडून
जीवनात बदल घडवून आणणे नसे वावगे“
त्याला माझे विचार पटले नाही व तो तसाच तिथून
त्या धर्मालयाकडे नाक मुरडून निघून गेला
आमच्या रक्तात इतर धर्माबद्दल राग बोकाळलेला आहे
आमचा धर्म चांगला व इतरांचा वाईट मनात रुळला आहे
आम्ही कितीही शिकू–सवरु पण इतर धर्माचा राग करण्यास न विसरू
शेवटी काय तर मानवी प्रवृत्ती, त्याला आपण काय करणार !
मी त्या मंदिर–मस्जिदीकडे पहिले व मनोमन तिथल्या देवास
माझ्या मित्रास सदबुद्धी देण्यास विनविले