मार्केटचा ब्रँड

देव ही मार्केटचा ब्रँड झाला

वेगवेगळ्या चॅनेल्सवर, वेगवेगळ्या रूपात,

कधी सोन्यात तर कधी रुप्यात,

कधी मोठमोठ्या कलाकारांच्या गळ्यात

तर कधी राजकारण्यांच्या मागे फिरणाऱ्या

साधू अन योग्यांच्या मढवून तुऱ्यात

तो ही सुपरमॉडेल झाला

केवळ त्याच्या नावावर

किंवा भांडवल करून त्याच्या भक्तीचे

किंवा दाखवून भय त्याच्या सामर्थ्याचे

त्याची छबी बसवून ताबीज किंवा लॉकेटात

वा बनवून वेगवेगळी मनोकामना सिद्धी यंत्रे

देव ही कमवे रुपये करोडो

देऊन भलती-सलती मंत्रे

त्याच्या नावाची वेगवेगळी दिसती वस्त्रे

कुठे टी शर्टवर फोटो

तर कुठे कुर्त्यावर नामस्मरणाचा लोगो

गमच्यावर नामस्मरणाची मंत्रे

कधी सी.डी. वर मंत्राचा संगीतमय जयघोष

तर कधी डी.जे. वर नृत्याचा हैदोस

कधी टी.व्ही. च्या वेगवेगळ्या चॅनेल्सवर

दाखवून लोकांच्या झालेल्या दुरुस्त व्याधी

वा वेगवेगळ्या अडीअडचणी

संमोहीत करिती हे गरजवंतास दाखवून खोटी आशा

सोबत दाखवून आपले विविध बँकेतील खाते

सांगून त्यांचे नंबर्स व ईमेल आय.डी.

भाग पाडती खर्च करण्यास दमडी

श्रद्धा ठेवावी परमेश्वरावर तोच कर्ता करविता

या वचनावरून ढळत चालला विश्वास आता

तो ही रूपे बदलून होऊन कमर्शियल

नाही राहिला दुःखीतांचा दाता